मुंबई महापालिकेत निवडणुकीच्या कामाची लगबग झाली सुरु!

132

भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नागरिकाला आपल्या संबंधीत विधानसभा मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येईल. मतदार यादीशी संबंधित दुरुस्त्या, दावे व आक्षेप निकाली काढणे इत्यादी सर्व कार्यवाही पूर्ण करुन ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हीच यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य राहणार आहे.

ही बाब लक्षात घेता, पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार म्हणून नोंदवावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करुन संविधानिक कर्तव्य बजावून मतदानाची सरासरी टक्केवारी वाढण्यासाठी मदत करावी, असे नम्र आवाहन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

भारत निवडणूक आयोगातर्फे १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये, १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नागरिकाला, त्याच्या संबंधीत विधानसभा मतदार यादीत आपले नाव नोंदविता येणार आहे. तसेच नाव व पत्त्यातील दुरुस्त्याही करणे, नावातील दुबार व समान नोंदी मतदार यादीमधून वगळणे, मृत व स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे तसेच याबाबत आक्षेप व दावेही दाखल करणे, ही सर्व कार्यवाही करता येणार आहे.

(हेही वाचा : क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना बहिणीच्या नात्याने आर्जव! म्हणाली…)

सर्व दावे व आक्षेप २० डिसेंबर २०२१ पर्यंत निकाली काढण्यात येवून १ जानेवारी २०२२ रोजी या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी ही ५ जानेवारी, २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. हीच प्रसिद्ध अंतिम मतदार यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईतील सर्व नागरिकांना या मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती व्हावी व अधिकाधिक प्रमाणात मतदार नोंदणी, नावातील दुरुस्त्या व्हाव्यात याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करुन मतदार नोंदणी जनजागृती करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये राबविण्यात येणार उपक्रम!

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत मुंबईतील प्रमुख ठिकाणी, तसेच प्रमुख रेल्वे स्थानके, दवाखाने, उद्याने, विमानतळ इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स लावण्यात येत आहेत.
  • विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिका-यांच्या बैठकांचे आयोजन करुन त्यांना अवगत करण्यात येणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मतदार नोंदणी कार्यक्रमाची महानगरपालिकेचे सर्व करदाते, व्यवसायिक व नागरिक यांना माहिती होईल, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
  • माननीय महापौरांमार्फत महानगरपालिकेच्या सभागृहात २२७ नगरसेवकांना मतदार यादी नोंदणी कार्यक्रमाची माहिती होईल, असा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे.
  • महानगरपालिकेच्या विविध कर देयकांवर तसेच बेस्ट, दूरध्वनी व महानगर गॅस यांच्या देयकांवर घोषवाक्य प्रकाशित करण्यात येत आहे. नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करुन व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
  • १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध होणाऱया विविध वृत्तपत्र जाहिरातींवर घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात येतील.
  • विविध वृत्तवाहिन्यांद्वारे या कालावधीत मतदार नोंदणी कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित करण्यात येईल.
  • कुलगुरु तसेच शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक महाविद्यालयात व शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करुन या कार्यक्रमाचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोचविण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असणार आहे.
  • कोविड – १९ साथरोग प्रतिबंधक निर्गमित शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन मुंबईतील सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्था यांच्या पदाधिकाऱयांच्या बैठका घेण्यात येतील. इमारतीमधील व समाजातील कोणताही घटक मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका जनजागृती करणार आहे.
  • कोविड – १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्य होईल तेथवर मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची www.nvsp.in व www.ceo.maharashtra.nic.in ही संकेतस्थळं उपलब्ध आहेत. तसेच चौकशीकरिता १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.