कायम हिंदू देवीदेवतांचा अपमान करणारा आणि आपणास धर्मांध असल्याचे सिद्ध करण्याची हौस भागवून घेणारा स्टॅन्ड अप कॉमेडीयन मुनव्वर फारूकीचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम अखेर रद्द झाला. त्याच्या या वृत्तीमुळे त्याच्या या कार्यक्रमाला विविध हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यामुळे अखेर सुरक्षेच्या कारणास्तव त्याचा हा कार्यक्रम रद्द झाला.
कार्यक्रमाला झाला विरोध!
हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती स्वतः प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली. २९ ऑक्टोबर या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुनव्वर फारूकी याचा ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा कार्यक्रम होणार होता, परंतु हिंदूंच्या देवतांवर सातत्याने अवमानकारक वक्तव्य करून त्यांची विटंबना करणारा मुनव्वर फारूकी हा या कार्यक्रमातही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावेल, त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी लेखी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली. याविषयी समितीसह अन्य धर्मप्रेमींनी २६ ऑक्टोबर या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना याविषयीचे पत्र देऊन या कार्यक्रमाला नाट्यगृहात परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. जर कार्यक्रमाला परवानगी दिली तर नाट्यगृहाच्या बाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मुंबईत बोरिवली आणि वांद्रे येथे होणारे मुनव्वर फारूकी याचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, यासाठी २७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले. श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भोसले, वज्रदल संघटनेचे अध्यक्ष संजय चिंदरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे सतीश सोनार यांनी हे निवेदन दिले.
(हेही वाचा : ‘स्टँडअप’ झाला लॉकअप)
मुनव्वर फारूकीचे या आधीचे ‘प्रताप’
भगवान श्रीराम आणि सीता यांच्या वनवास काळाचे अश्लील वर्णन करून त्यांचा अवमान करणारा स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती. इथे आयोजित करण्यात आलेल्या एका कॉमेडी शोमध्ये मुनव्वर फारुकी याने हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर सुटला आहे.
Join Our WhatsApp Community