दृष्टी गमावलेल्या ‘त्या’ रुग्णांची भाजपाने मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण!

२०१९ मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही नागरिकांना पूर्णत: किंवा अंशत: अंधत्व आले.

102

दोन वर्षांपूर्वी जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे काही रुग्णांना पूर्णत: तसेच अंशत: अंधत्व आले होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या पीडितांना पालिका प्रशासनाने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्या नागरिकांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जावी, तसेच या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेत सामावून घेत त्यांच्या जीवनातील अंध:कार कायमचा दूर करावा, अशी मागणी भाजपने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिडीत नागरिकांना २० लाख रुपयांची भरपाईची मागणी

२०१९ मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही नागरिकांना पूर्णत: किंवा अंशत: अंधत्व आले. ही धक्कादायक बाब बुधवार, २३ जानेवारी २०१९ रोजीच्या स्थायी समितीमध्ये तत्कालीन स्थायी समिती सदस्य अभिजित सामंत यांनी उघडकीस आणत प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या फेब्रुवारी २०१९ च्या महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या पिडीत नागरिकांना २० लाख रुपयांची भरपाई व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन महापौरांनी याबाबतचे निर्देशही प्रशासनाला दिलेले होते. या अपघातात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर झालेल्या जंतूसंसर्गाने तीन जणांना कायमचीच दृष्टी गमवावी लागली, तर चार जणांची दृष्टी अंधुक झाली आहे. हे सर्व नागरिक सध्या रोजगाराविना आहेत. त्यात एक पिडीत रुग्ण टेम्पोचालक तर एक जण रिक्षाचालक असून इतर दोन महिला उदरनिर्वाहाकरिता कुटुंबियांवर अवलंबून आहेत.

(हेही वाचा : चहल यांनी महापालिका आयुक्त आहोत हे दाखवून द्यावे! विरोधी पक्षनेत्यांचे आव्हान)

दीपावलीमध्ये पिडीत रुग्णांचे आयुष्य प्रकाशमान करावे

दुर्दैवाने ही घटना अशा हॉस्पिटलमध्ये झाली आहे, ज्याला आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेले आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयात लक्ष घालत पालिका प्रशासनाला सक्त आदेश देऊन मनपा फेब्रुवारी २०१९च्या सभेत संमत झालेल्या ठरावानुसार २० लाख रुपयांची नुकसान भरपाई, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस महापालिका सेवेत सामावून घ्यावे. तसेच या दीपावलीमध्ये पिडीत रुग्णांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य प्रकाशमान करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विलेपार्ले येथील नगरसेवक व सुधार समिती सदस्य अभिजीत सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.