नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबई बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस या ठिकाणी कॉर्डिलिया क्रूझवर सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावली. त्यावेळी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अटक केली. तेव्हापासून ते आर्यनला जामीन मिळेपर्यंतचा घटनाक्रम नाट्यमय होता. तो सर्व घटनाक्रम कसा होता, हे थोडक्यात पाहूया…
- २ ऑक्टोबर : नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी त्यांच्या पथकासह मुंबई बंदरातून गोव्यात निघालेल्या कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छापेमारीत एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट, दिल्लीतील मॉडेल मूनमून धामेचासह आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काही प्रमाणात ड्रग्स आणि रोकड जप्त केली होती.
- ३ ऑक्टोबर : एनसीबीने अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तिघांना अटक केली. या तिघांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची (४ ऑक्टोबर) पर्यत एनसीबी कोठडी सुनावली होती. त्याच दिवशी सायंकाळी एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ५ जणांना अटक करण्यात केली होती.
- ४ ऑक्टोबर : न्यायालयाने आर्यन सह तिघांना नियमित किल्ला न्यायालयात हजर केले असता तिघांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती.
- ७ ऑक्टोबर : आर्यन सह तिघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
- ८ ऑक्टोबर : आर्यन खानची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली व कारागृहात, कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवले, न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली.
- ८ ऑक्टोबर : जामिनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीने त्यावर आक्षेप घेतला. मुख्य महानगदंडाधिकारी न्यायालयाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन अर्ज फेटाळला.
- ९-१० ऑक्टोबर : शनिवार, रविवार असल्याने कोर्ट बंद
- ११ ऑक्टोबर : सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर. एनसीबीने अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे न्यायालयाकडून निर्देश
- १२ ऑक्टोबर : न्यायालयात काहीही कारवाई नाही
- १३ ऑक्टोबर : जामिनावर सुनावणी झाली, एनसीबीचा जोरदार विरोध
- १४ ऑक्टोबर : जामिनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला गेला
- १५ ते १९ ऑक्टोबर : न्यायालय सणासुदीच्यानिमित्ताने बंद असल्यामुळे २० ऑक्टोबर जामिनावर सुनावणी होती.
- २० ऑक्टोबर : सकाळी ११:३० वाजता न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू करण्यात आल्यानंतर न्यायालयाने क्रमवार असलेल्या खटल्यावर सुनावणी सुरू केली. आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामिनावरील सुनावणी दुपारच्या सत्रात ठेवण्यात आली. दुपारी दुसऱ्या सत्रात न्यायधीश वी.वी. पाटील यांनी निर्णय वाचून दाखवत आर्यन खान आणि इतर दोघांना बुधवारी जामीन नाकारत त्याचा जामीन अर्ज रद्द केला. जामीन नाकारण्यामागे मुख्य कारण हे आर्यन खानचे व्हाट्सएप चॅट आहे. या चॅट मध्ये तो ड्रग्स विक्रेत्याच्या संपर्कात होता व ड्रग्सच्या व्यवहारात सक्रिय होता. जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा ड्रग्स विक्रेत्याच्या संपर्कात येऊ शकतो, असे एनसीबीने न्यायालयात सादर केलेले म्हणणे सत्र न्यायालयाने मान्य केले.
- २६ ऑक्टोबर : खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू केली. वरिष्ठ वकील आणि भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडताना असा युक्तिवाद केला की, त्याच्याकडून कोणतेही ड्रग्स जप्त करण्यात आलेली नाही आणि कोणत्याही वैद्यकीय चाचणीत त्याने ड्रग्स घेतल्याचे दिसून आले नाही. दुसरीकडे, एनसीबीने जामीन अर्जाला विरोध केला आणि आरोप केला की, २३ वर्षीय तरुण केवळ ड्रग्जचा उपभोक्ता नव्हता, तर तो अवैध ड्रग्स तस्करीतही सामील होता. न्यायालयाने २७ ऑक्टोबरला सुनावणी तहकूब केली.
- २७ ऑक्टोबर २०२१ : उच्च न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू ठेवली. अरबाज मर्चंटच्या जामीन याचिकेसाठी आपला युक्तिवाद सुरू ठेवताना, या खटल्यातील आरोपींचे प्रतिनिधीत्व करणारे वकील अमित देसाई म्हणाले, “त्यांच्यावर (आरोपी) केवळ कमी प्रमाणात आणि वापराचा आरोप ठेवण्यात आला होता.” ही अटक बेकायदेशीर असल्याचेही देसाई म्हणाले.
- २८ ऑक्टोबर २०२१ : आर्यन खानच्या वकिलाने मांडलेल्या युक्तिवादानंतर एनसीबीचे उत्तर ऐकल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन आणि अन्य दोन आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करताना, एनसीबीचे वकील एएसजी अनिल सिंग म्हणाले होते की, अर्जदार आर्यन खान गेल्या दोन वर्षांपासून ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे. त्यामुळे आर्यनची अटक ‘बेकायदेशीर’ नाही.
(हेही वाचा : क्रूझ ड्रग्स प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अशी होणार चौकशी)
Join Our WhatsApp Community