पोलिसांना धड मिळाले होते, मात्र मुंडके मिळाले नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पथकाने या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी परिसरात आपल्या खबऱ्याचे जाळे तयार केले. घटनेच्या आदल्या दिवसापासून मृतदेह मिळेपर्यंत या परिसरात बाहेरची व्यक्ती कोणी आली होती का? कोणी संशयास्पद होते, ही माहिती काढण्यास सुरुवात केली होती. तसेच अँटॉप हिल परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते. गुन्हे शाखने २९ सप्टेंबरच्या रात्रीचा मोबाईल कंपन्यांकडून डम डेटा ( ऍक्टिव्ह मोबाईल यादी) मिळवली. लाखो- हजारो डम डेटा तपासण्याचे काम सुरू होते, तर दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते.
त्याने वैद्यकीय रजा घेतली
हे सर्व सुरू असताना एका खबऱ्याने महत्वाची माहिती तपास पथकाला दिली. २९ सप्टेंबर रोजी रात्री एसीपी मॅडमच्या वाहनावरील चालक पोलिस शिपाई शिवशंकर गायकवाड हा रात्री ‘वॅगनार’ या खाजगी वाहनातून परिसरात आला होता. दरम्यान तपास पथकाला ही वॅगनार सीसीटीव्हीत देखील दिसली. मात्र थेट त्याच्यावर संशय घेण्यापूर्वी तपास पथकाने शिवशंकर याची माहिती मिळवली असता शिवशंकर हा वरळी पोलिस वसाहत या ठिकाणी राहत असून २९ सप्टेंबर रोजी त्याने वैद्यकीय रजा घेतली होती. तपास पथकाचा त्यांच्यावरील संशय बळावला आणि तपास पथकाने त्याच्या मोबाईल क्रमांकाची माहिती मागवून घेतली. २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलमध्ये एक अनोळखी मोबाईल क्रमांकावर बऱ्याच वेळ कॉल केल्याचे समोर आले.
मृतदेहाच्या हातावर ‘दादा’ गोंदलेले दिसले, आणि…
तपास पथकाने हा मोबाईल क्रमांक कॉलर आयडीवर टाकला असता त्यात ‘दादा’ असे नाव समोर आले. त्याच वेळी तपास पथकातील एका पोलिस अमलदाराच्या डोक्यात पाल चुकचुकली आणि तो मिळालेल्या मृतदेहाच्या अवयवाचे छायाचित्रे तपासू लागला आणि ‘दादा’चा शोध लागला. मृतदेहाच्या डाव्या हातावर ‘दादा’ असे गोंदलेले दिसल्यामुळे तपास पथकाला तपासाची योग्य दिशा मिळाली. तपास पथकाने या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता हा मोबाईल नंबर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मिर्ची व्यापारी दादा जगदाळे याचा असल्याचे कळले. गुन्हे शाखेचे एक पथक अकलूज येथे रवाना झाले आणि त्यांनी दादा जगदाळे याची माहिती मिळवली असता दादा जगदाळे हा मागील दोन आठवड्यापासून कुटुंबाच्या संपर्कात नसल्याचे कळले. दादा जगदाळे हा नेहमी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे या शहरामध्ये फिरत असतो, आठ-आठ दिवस बाहेर राहणारा दादा जगदाळे हा यावेळी देखील कामानिमित्त बाहेर असेल म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला नाही की हरवल्याची तक्रार दाखल केलेली नव्हती. शिवशंकर याची पत्नी मनाली ही देखील अकलूज गावातील असून दादा जगदाळे हा तिचा शाळेतील मित्र असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली व गेली दीड वर्ष ती पतीला सोडून गावातच होती, काही महिन्यांपूर्वीच मुंबईला पतीच्या घरी गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या सर्व माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेला खात्री पटली की या हत्येत शिवशंकर याचा सहभाग असावा.
(हेही वाचा : पत्नीच्या मित्राची हत्या करून ‘तो’ चालवायचा एसीपीचे वाहन!)
…आणि शिवशंकरभोवती रचला सापळा
गुन्हे शाखेने गुन्ह्याची उकल केल्याची माहिती शिवशंकरला कळू दिली नाही. शिवशंकर देखील केवळ पोलिस ठाणे काय करीत आहे, कसा तपास करीत आहे, याच्यावर लक्ष ठेवून होता. मात्र गुन्हे शाखेच्या तपासाची जरा देखील कल्पना त्याला नव्हती. गुन्हा घडल्यानंतर आठवड्याभराने शिवशंकर याने गावी जायचे असल्याचे सांगून रजा टाकली होती. मात्र तो गावी गेलाच नव्हता आणि त्याचा मोबाईल देखील बंद होता. त्त्या काळात शिवशंकर हा घरातच असल्याचे कळले होते. मात्र त्याला कळू न देता त्याला काही निमित्ताने बाहेर आणून गुन्हे शाखेत आणायचे होते, त्यासाठी गुन्हे शाखा योजना आखत होती. त्याच वेळी वरळी पोलिस वसाहतीचे डागडुजीचे काम सुरू होते. शिवशंकर राहत असलेल्या इमारतीचे देखील काम सुरू होते. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजित मोरे आणि इतर दोन अधिकारी कंत्राटदार तर पोलिस शिपाई सुपरवायझर बनून घराची पाहणी करण्याच्या निमित्ताने शिवशंकर याच्या घरात गेले. त्यावेळी त्याची पत्नी, आई आणि दोन मुली घरी होत्या. आम्ही कंत्राटदार आहोत, घरात कुठे पडझड झाली का, ते बघण्यासाठी आलो असल्याचे सांगत घरात प्रवेश मिळवला. त्यावेळी घराच्या बेडरूममध्ये शिवशंकर दिसला. गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी घराची पाहणी केली आहे, तुम्हाला खाली ऑफिस मध्ये 2 येऊन सही करावी लागेल, असे बोलून शिवशंकरला इमारतीच्या खाली आणून पोलिस व्हॅन मध्येच बसवत गाडी थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आली. आपला खेळ संपल्याचे शिवशंकरच्या लक्षात आले आणि त्याने कार्यालयात आणल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली.