सुप्रसिद्ध कर्करोग सर्जन डॉ. राजेंद्र बडवे यांना प्रसिद्ध ‘नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार डॉ. बडवे यांना त्यांनी कर्करोगावरील उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याप्रकरणी दिला जाणार आहे. या क्षेत्रामध्ये डॉ. बडवे यांना तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी भारतासह विदेशातील अग्रगण्य संस्थांमध्ये काम केले आहे. टाटा कर्करोग रुग्णालयात सेवा पुरवताना डॉ. बडवे यांचा ‘कर्करोगाचे उपचार आणि औषधे ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांच्या आवाक्यात यावीत’, यासाठी त्यांचे प्रयत्न कायम असतात. डॉ. बडवे हे टाटा रुग्णालयाचे संचालक आणि सर्जिकल अॉकोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.
विद्यार्थी जीवन
विद्यार्थी दशेत असताना डॉ. राजेंद्र बडवे हे हुशार होते. गणित विषयात त्यांना ‘आठल्ये मेडल फॉर मॅथ्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात भवितव्य घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी दोराब टाटा स्कॉलरशिप अंतर्गत एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत त्यांनी ‘मेडिकल सर्जरी’ विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
विदेशातही वैद्यकीय सेवा पुरवली
टाटा मेमोरियल रुग्णालयाआधी डॉ. राजेंद्र बडवे यांनी विदेशात वैद्यकीय सेवा पुरवली. त्यामध्ये त्यांनी टोकोयो येथील टोरोनोमोन रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरवली आहे. याशिवाय लंडन स्थित किंग्स कॉलेज लंडन स्कुल ऑफ मेडिसिन आणि रॉयल मार्सेडेन रुग्णालयातही त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. २०१३ साली डॉ. बडवे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड २०२१
हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. जो विविध क्षेत्रात यशस्वी विभूतींना प्रदान केला जातो. त्यामध्ये वरिष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम, अनुप जलोटा, श्रीपाद नाईक, धनराज पिल्लई यांच्या नावाचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community