वरळीत कोळीबांधवांनी बंद पाडले कोस्टल रोडचे काम!

कोस्टल रोडच्या कामाला विरोध करण्यासाठी स्थानिक कोळीबांधव बोटी घेऊन थेट समुद्रात उतरले.

194

कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी परस्पर बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून वंचित केले आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याविरोधात शनिवारी, ३० ऑक्टोबर रोजी वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार थेट समुद्रात उतरले आणि त्यांनी काम बंद पाडले. तसेच त्या भागाचे आमदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

कोस्टल रोडच्या विरोधात कोळीबांधव उतरले समुद्रात

या रोडच्या कामाला विरोध करण्यासाठी स्थानिक कोळीबांधव बोटी घेऊन थेट समुद्रात उतरले. तसेच काम सुरु असलेल्या बार्जेसला घेराव घातला. त्याच वेळी स्थानिक आमदार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही संताप व्यक्त करू लागले. आमच्या गावातून निवडून गेलेले आदित्य ठाकरे आता आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना इथे फिरकतही नाहीत. बाजूला परळमध्ये आग लागली तिथे जातात, असा शब्दांत कोळी बांधवांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचा निषेध केला.

(हेही वाचा : नवाब मलिकांची फसगत, आरोप करण्याच्या नादात भलताच किरण गोसावी झाला ‘टार्गेट’)

तोवर काम बंद पाडणार!

मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार करत आहेत. मच्छिमारांनी आतापर्यंत समतोल भूमिका घेतली होती, परंतु आता प्राधिकरणाच्या अशा हुकूमशाही पद्धतीच्या कामावर आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी मच्छिमारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोस्टल रोडचे काम बंद करण्याची भूमिका घेतली आहे. मच्छिमारांची मुख्य मागणी मासेमारीकरता जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची आहे. प्राधिकारण त्याचे अंतर ६० मीटर ठेवत आहे. उद्या जर दुर्घटना झाली, तर त्याची जबाबदारी कुठलाच विभाग स्वीकारणार नाही, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे. आज मच्छिमारांकडून अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले असून मोठ्या प्रमाणात पोलिस फोर्स आणि आरसीएफ तैनात करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.