एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच! महामंडळाला बसला आर्थिक फटका

रविवारीही आंदोलन सुरुच राहिल्यास कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटीस पाठवण्याचा, तसेच वेतन रोखण्याचा आणि अडीच हजार रुपये दिवाळी भेट न देण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे.

131

अनियमित वेतन समस्येला कंटाळून एसटीच्या २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे महामंडळाचे राज्य सरकारमध्येच विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटीचे कामगार संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील सुमारे २५ आगारांचे काम ठप्प आहेत. त्यामुळे महामंडळ आणखी आर्थिक खाईत लोटले गेले आहे.

रविवारीही आंदोलन केल्यास कारवाई होणार

एसटी महामंडळातील सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने यापूर्वी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी बैठक होताच, कृती समितीने आंदोलन मागे घेतले. मात्र एसटी महामंडळाच्या काही संघटनांनी आंदोलनाची हाक कायम ठेवली. त्यामुळे राजकीय दबावाने ज्या आगारांत आंदोलन करण्यास भाग पाडले, तेथील स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या असून रविवारीही आंदोलन सुरुच राहिल्यास कामगारांना सेवा समाप्तीच्याही नोटीस पाठवण्याचा तसेच वेतन रोखण्याचा आणि अडीच हजार रुपये दिवाळी भेट न देण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे.

(हेही वाचा : दहावीच्या ‘ऑनलाईन निकाला’चा फज्जा शिक्षण मंडळामुळेच!)

३ लाख परीक्षार्थींची गैरसोय

लातूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, यवतमाळ व अन्य काही भागातील आगारातील बस सेवा बंद राहिली. रात्री उशिरापर्यंत या भागातील एसटी सेवा सुरु झाली नव्हती. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणची एसटी बससेवा बंद असल्याने आज, रविवारी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या ‘गट ड’ संवर्गाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्यातील सुमारे तीन लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. एसटी महामंडळाच्या गडचिरोली, लातूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर यांसह सुमारे २५ आगारांतील वाहतूक बंद आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपुढे परीक्षा केंद्रावर पोहोचायचे कसे, असा प्रश्न आहे. आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील परीक्षेसाठी राज्यात समारे चार लाख उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे तीन लाख उमेदवारांनी परीक्षेचे ओळखपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.