कोरोनाप्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना आता दुसऱ्या डोसनंतर १५ दिवस उलटल्यावर लोकल ट्रेनचे तिकीट मिळणार आहे. या संदर्भातील पत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला लिहिले आहे. यापूर्वी दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांना केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता लोकलचे दैनंदिन तिकीट मिळणार आहे.
यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १५ ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांना तिकीटाऐवजी मासिक पास घ्यावा लागत होता. पण आता राज्य सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या नागिरकांना दैनंदिन तिकीट मिळावे यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने रेल्वेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी रेल्वे स्थानकावर तैनात करावेत. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरीकच पास किंवा तिकीट घेत आहेत का, याबाबतची तपासणी करावी.
(हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच! महामंडळाला बसला आर्थिक फटका)
मध्य, पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरु
२८ ऑक्टोबर २०२१ पासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या १०० टक्के फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. २२ मार्च २०२० पासून कोविड-१९ लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर १५ जून २०२० पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या.
Join Our WhatsApp Community