पर्वतारोहण म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञानच – न्या. मृदुला भाटकर

173

पर्वतारोहण म्हणजे केवळ क्रीडा प्रकार वा एक कृती नाही तर ते जीवनाचे एक तत्वज्ञानच असून, त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, भयरहीत मन व मानसिक बळ तसेच प्रशिक्षणाने भारलेले बळकट शरीर याची गरज असते. कर्नल प्रेमचंद यांनी या गुणांच्या शिखरावर पाऊल रोवले व त्यातूनच गिर्यारोहणामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. कांचनगंगा शिखर मोहीमेचे ते नायकच होते, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी कर्नल प्रेमचंद यांचा गौरव केला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिल्या गेलेल्या शिखर सावरकर पुरस्कार २०२० च्या ऑनलाईन सोहळ्यामध्ये कर्नल प्रेमचंद यांना शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार २०२० घोषित केला, त्यावेळी न्या. भाटकर बोलत होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व सावरकर माउन्टेनियरींग क्लब यांनी हा समारंभ प्रस्तुत केला होता.

 

पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला पुरस्कारांची माहिती देण्यात आली. सोहळ्यामध्ये एकंदर तीन महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले. ऑनलाईन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर, राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तर राज्याच्या सीआयडी विभागाचे प्रमुख व अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सारकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पुरस्काराबाबतची पूर्वपीठिका सांगितली व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सेवा, शिक्षण, संस्कार, समर्पण, सुरक्षा या पाच तत्वाच्या भावनेतून घालून दिलेल्या मार्गाने सावरकर स्मारक वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले. तसेच देशभक्तीचा प्रसार व प्रचार यासाठी प्रयत्न करीत असून, पर्वतारोहणाचे हे क्षेत्र त्यामधीलच एका प्रयत्नाचा भाग असल्याचे सांगितले. यामधून २०१५ मध्ये स्मारकाने मोहीम हाती घेतली व हिमाचल प्रदेशातील निनावी शिखर स्मारकाच्या चमूने मोठ्या हिकमतीने सर केले. ते शिखर त्यावेळी सावरकर यांच्या नावाने तेथे भारताचा ध्वज व सावरकरांनी तयार केलेला ध्वज लावून सर केले. तो २३ ऑगस्ट हा दिवस होता. या निमित्ताने त्या म्हणाल्या की, पर्वतारोहणाच्या या क्षेत्रातील पुरस्कार विजेत्या या व्यक्ती नसून, सावरकरांच्या आदर्शाच्या सावल्या आहेत. यावेळी त्या शिखर सावरकर सर केलेल्या मोहीमेची ध्वनिचित्रफितही सादर केली गेली.

Shivdurg mitra Mansmman Pat

शिवदुर्ग मित्र लोणावळा – शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार

पुरस्कार सोहळ्यात सर्वप्रथम लोणावळा जिल्हा पुणे येथील शिवदुर्ग मित्र या संस्थेला अतुलचंद्र कुलकर्णी यांनी शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार २०२० घोषित केला व त्या संस्थेच्या विविध कामांची माहिती दिली. शिवदुर्ग मित्र या संस्थेची स्थापना १९८० मध्ये वि. का. गायकवाड यांनी केली गिर्यारोहण, किल्ले विविध मार्गाने सर करणे इतकेच नव्हे तर दुर्घटनांमध्ये मदत करणे, प्राणीरक्षण अशा विविध कामांमध्येही संस्थेने मोलाची कामगिरी केली आहे. संस्थेने नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच दुर्घटनांमध्ये सुमारे १००० लोकांचे प्राण वाचवले असून, दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्या व अतिशय कठीण अशा नैसर्गिक स्थितीत अडकलेले २५० मृतदेहही काढून त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द केले आहेत. संस्थेच्या अशा कामाची माहिती देत अतुलचंद्र कुलकर्णी यांनी प्रशंसा केली. यावेळी संस्थेचे आनंद गावडे व सुनील गायकवाड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या व पुरस्काराबद्दल आभार मानले.

suraj malusare1

सुरज मालुसरे यांना शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार

प्रवीण दीक्षित यांनी शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२० हा सुरज मालुसरे या युवकाला घोषित केला, आणि त्याने अतिशय लहान वयात केलेल्या प्रस्तरारोहण, सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये केलेले धाडसी भ्रमण, तेथील वनवासी लोकांशीही साधलेला संवाद याची माहिती दिली. प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट याबरोबरच या कौशल्याचे ग्रहण हे त्यांचे यश आहे व मालुसरे या नावालाही त्यांनी सार्थ केले असल्याचे सांगितले. सुरज मालुसरे यांनी आपल्या मनोगतातून या आपल्या कामगिरीला मिळालेले हे प्रोत्साहन असून, ते आपल्या पुढील वाटचालीसाठी एक प्रतीक ठरणार आहे, असे सांगितले. तसेच हा पुरस्कार आपले गुरू व मित्र अरुण सावंत यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले.

colonel premchand

कर्नल प्रेमचंद यांना शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार 

शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार २०२० हा पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी घोषित करून कर्नल प्रेमचंद यांना प्रदान केला. कर्नल प्रेमचंद यांची माहितीही त्यांनी दिली. यानंतर पुरस्कार विजेते कर्नल  प्रेमचंद यांनी पर्वतारोहणामध्ये आपली सुरुवात कशी झाली, डोगरा बटालियनमध्ये दाखल झाल्यानंतर लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये कसे पर्वतारोहण केले व महत्त्वाची कामगिरी बजावली. इतकेच नव्हे तर भारतीय पर्वतारोहणामध्ये भारतीय गिर्यारोहकांना पुढे यश मिळेल, असे त्यावेळी मोठ्या गिर्यारोहकांनी नमूद केले होते, त्याचीही आठवण त्यांनी यावेळी कथन केली. स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी यांनी हे पुरस्काराचे काम म्हणजे सावरकरांच्या साहसी जीवनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सोहळ्यामध्ये स्वातंतत्र्यवीरांची जयोस्तुते श्री महन्मंगले व अनादी मी अनंत मी ही गीते अतिशय वेधकरीतीने सादर केली गेली. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात चित्रा मसलेकर यांच्या ‘वंदे मातरम’ने सोहळ्याची सांगता झाली.

२३ ऑगस्ट २०१५ रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’तर्फे ‘शिखर सावरकर’ ही मोहीम यशस्वी करण्यात आली होती. हिमालय पर्वतरांगेमधील कर्चा नाला येथील बातलस्थित स्पिती व्हॅलीतील अनामिक (अननेम्ड) असे आणि आजवर पादाक्रांत न केलेले असे हे शिखर असून ते स्मारकाच्या चमूने सर केले. देवेंद्र गंद्रे व राजेंद्र वराडकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम ७ जणांनी यशस्वी केली आणि या शिखराची ओळख आता ‘शिखर सावरकर’ अशी झाली असून, हे नाव आता अजरामर झाले आहे. या मोहिमेला २३ ऑगस्ट २०२० रोजी ५ वर्षे पूर्ण होत असून, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सावरकर स्मारकातर्फे शिखर सावरकर उदयोन्मुख गिर्यारोहक पुरस्कार (युथ अॅडव्हेंचर) , शिखर सावरकर दुर्ग संवर्धक संस्था (युथ टीम अॅडव्हेंचर) , शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार असे सुरू करण्यात येत आहे. हे पुरस्कारांचे पहिले वर्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.