माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणी गंभीर आरोप प्रकरणी सीबीआय चौकशी करत आहेत. त्याअंतर्गत ३१ ऑक्टोबर रोजी सीबीआयने पहिली अटक केली आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्याचे नाव संतोष जगताप असे आहे.
अनिल देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने तपासात पहिली अटक केली. संतोष जगताप या मध्यस्थाला ही अटक करण्यात आली आहे. जगताप याला ठाण्यातून अटक करण्यात आली. याआधी सीबीआयचा अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने देशमुखांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली होती. मात्र १०० कोटीच्या प्रत्यक्ष वसुलीच्या आरोपामध्ये जगताप याची पहिली अटक आहे. संतोष जगताप याला ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. जगताप हा अनिल देशमुख यांची खास व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयने जगतापला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.
(हेही वाचा : खून करून खुशाल नोकरीवर रुजू होणारा पोलिस ‘असा’ अडकला जाळ्यात)
देखमुखांच्या अडचणी वाढल्या
नुकतेच अनिल देशमुख यांनी ईडीचा समन्स रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, न्यायालयाने हा समन्स रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे सीबीआय देखील देशमुखांच्या शोधात आहे. देशमुख सध्या बेपत्ता आहेत. अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी देशमुखांची धडपड सुरु आहे. अशा वेळी आता वसुलीच्या प्रकरणात सीबीआयने अटक कारवाई सुरु करणे देशमुखांची धोक्याची घंटा आहे.
Join Our WhatsApp Community