इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनच्यावतीने मुंबईसह प्रत्येक शहर आणि तालुक्यांमध्ये रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विरोधातच आता युवा सेना रस्त्यावर उतरली असून, एरव्ही पक्षाची ताकद असणाऱ्या शिवसैनिकांना मात्र या आंदोलनापासून पुन्हा एकदा लांब ठेवण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर काढलेल्या मोर्चानंतर युवा सेनेने दुस-यांदा रस्त्यावर उतरत, मुंबईसह राज्यात आपली ताकद दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युवा सेना आता पुढे-पुढे जात असून, शिवसेना मात्र मागे जात आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जुन्या शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेनेचा रथ पुढे हाकता येणार नसून, युवा सेनेच्या माध्यमातून पुढील २५ वर्षांचा विचार करता आदित्य ठाकरे हे वरुण सरदेसाईला सोबत घेत शिवसेनेची दुसरी फळी निर्माण करताना त्यांना सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
वरुण सरदेसाई रॅलीत सहभागी
शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेतर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक शहर व तालुक्यामध्ये इंधन दरवाढ विरोधात रविवारी सकाळी साडेदहा ते साडेबाराच्या दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये खुद्द सरदेसाई हे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील रॅलीत सहभागी झाले होते. बोरीवली येथून निघालेल्या या रॅलीत त्यांच्या सोबत सिध्देश रामदास कदम व युवा सेनेचे पदाधिकारी व युवा सैनिक सहभागी झाले होते.
शिवसैनिकांना ठेवले दूर
शिवसेना सचिव आणि युवा सेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्या व महिला विधानसभा संघटिका सुप्रदा फातरर्फेकर आदी चेंबूरमध्ये आयोजित रॅलीत सहभागी झाले होते. युवा सेनेचे कोषाध्यक्ष व नगरसेवक अमेय घोले यांनी मुंबई वडाळा येथील रॅलीचे आयोजन केले होते. गोरेगावमध्ये युवा सेनेच्या या आंदोलनात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही युवा आंदोलनात सायकल चालवत सहभाग नोंदवला होता. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले असले, तरी शिवसैनिकांना मात्र दूर ठेवण्यात आले होते.
या भागांत झाली आंदोलने
याशिवाय धारावी, मानखुर्द शिवाजी नगर, कुलाबा, वांद्रे पूर्व विधानसभा, शिवडी आणि राज्यातील सिन्नर तालुका दिंडोरी विधानसभा, वरोरा, चिमुर व ब्रह्मपुरी विधानसभा, मावळ विधानसभा, रायगड विधानसभा, नाशिक शहर विधानसभा, मिरा भाईंदर विधानसभा, गुहागर विधानसभा, नागपूर पूर्व-उत्तर विधानसभा, आळंदी देवाची शहर, चिपळूण संगमेश्वर विधानसभा, लांजा राजापूर, पालघर विधानसभा आदी ठिकाणी युवा सेनेने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
युवा सेनेच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न
युवा सेनेचे हे दुसरे मोठे आंदोलन असून, अंधेरी जुहूमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अदिश बंगल्यावर युवा सेनेने पहिले आंदोलन केले होते. शिवसैनिकांना कल्पना न देता आपल्या ताकदीवर युवा सेनेने हे आंदोलन युवा सेना सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पाडले होते. त्यानंतर इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकार विरोधात युवा सेनेला रस्त्यावर उतरवत आजवर दुर्लक्षित असलेल्या युवा सेनेच्या पंखात बळ आणण्याचा प्रयत्न युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून सुरू आहे.
शिवसेनेला मजबुती देण्याचे काम सुरू
शिवसेनेतील पहिली फळी आता सुस्तावलेली असून, निष्ठावंत शिवसैनिकांची संख्याही घटत चालली आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक अशीच ओळख देणाऱ्या शिवसेनेत आता उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिक अशी दुसरी पिढी आता युवा सेनेच्या माध्यमातून पुढे येत आहे. त्यामुळेच शिवसैनिकांवर अवलंबून न राहता युवा सेनेची मजबूत फळी निर्माण करुन, शिवसेनेला पुढील २५ वर्षांत मजबूत स्थितीत आणण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी शिवसेनेतील जुन्या शिवसैनिकांना मागे ठेवले जात आहे, असे या आंदोलनावरून स्पष्ट होते.
देसाई, सरदेसाईंवर सेनेचा विश्वास
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवताना पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी सुभाष देसाई यांच्यावर सोपवली होती, तर आज युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्या खांद्यावर ही जबाबदारी असून, देसाई आणि सरदेसाई यांच्यावरच ठाकरे कुटुंबाचा विश्वास असल्याचेही पहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community