पुन्हा कोकण गजबजले! दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनाला जोर

गणपतीपुळे, गुहागर, दापोली, संगमेश्वर पुढे मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी अशी समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत.

151

मागील दोन दिवसांपासून दिवाळीच्या सुटीसाठी अनेकजण घराला टाळे ठोकून कुटुंबकबिला सोबत घेऊन लांबच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र त्यांचे मार्गक्रमण कुठे कुलूमनाली, कश्मीर किंवा परदेशातील थंड हवेच्या ठिकाणी नाही, तर भारताचे कॉलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या दिशेने सुरु आहे. होय! दिवाळीच्या आधीच कोकणात पर्यटकांनी तुडुंब गर्दी केली आहे. ‘येवा कोकण आपलाच असा’, अशी हाक देणारे कोकणवासीय आता या दिवाळीच्या सुटीत पर्यटन व्यवसायातून जास्तीत जास्त आर्थिक मिळकत कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्नात आहेत.

कोकणवासीयांची चिंता मिटली

गेले वर्षभर कोरोना महामारीत गेले. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प होता. साहजिकच पर्यटनावर अवलंबून असलेल्या कोकणवासीयांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र आता ‘देवाक् काळजी’ म्हणून रवळनाथावर विश्वास ठेवून हेही दिवस बदलतील, अशी आस लावून धरलेल्या कोकणी बांधवांच्या हाकेला अखेर रवळनाथ धावून आला. दिवाळीच्या तोंडावर कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आला. त्यामुळे सरकारने पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरु केला आणि कोकणवासीयांची चिंता मिटली.

(हेही वाचा : १ नोव्हेंबरपासून ‘हे’ बदल तुमच्या आयुष्यावर करणार परिणाम!)

हॉटेल्स झाली फुल्ल

गणपतीपुळे, गुहागर, दापोली, संगमेश्वर पुढे मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी अशी समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. शांत, स्वच्छ, निळसर समुद्र किनारे पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. म्हणूनच या भागातील सर्व हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल झाली आहेत. कोकणच्या रस्त्यावर पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. विशेष म्हणजे ही आरक्षणे आधीच झाली होती. महाराष्ट्रासह देशातील अन्य भागातूनही पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. वॉटर स्पोर्ट्सला परवानगी मिळाल्याने येथील पर्यटन व्यवसायात दुपटीने वाढ होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.