कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र राज्यात पोलिसांनी पहारा दिला, आणि आपले कर्तव्य बजावले. मात्र अशा लढवय्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून ठाकरे सरकारने केवळ ७५० रूपये जाहीर केले आहे. इतकेच नाही तर या बोनसच्या रक्कमेसाठी त्यांनी कित्येक नियम आणि अटी देखील ठेवल्या आहेत. जीवघेण्या कोरोना सारख्या कठीण काळात स्वतःसह स्वतःच्या कुटुंबियांचा कोणताही विचार न करता मुंबई पोलिसांनी अहोरात्र काम केले. मात्र याबदल्यात ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची चेष्टा केल्याचे म्हटले जात आहे. कारण ठाकरे सरकारने अवघ्या ७५० रूपयांचा बोनस जाहीर करून पोलिसांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अमित साटम यांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.
‘…तर पोलिसांचा अपमान करू नका’
कोरोना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री घरात राहून फेसबुक लाईव्हद्वारे राज्याचा गाडा हाकत होते, त्यावेळी संपूर्ण पोलीस बांधव स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत होते. अशा प्रकारे कर्तव्य बजावून स्वतःचा जीव धोक्यात टाकणाऱ्या पोलिसांना ठाकरे सरकारकडून देण्यात आलेला दिवाळी बोनस हा तुटपुंजा आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजप आमदार अमित साटम यांनी दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ज्यावेळी ठाकरे सरकारचे गृहमंत्री १०० कोटींची वसुली करतात आणि ते फरार आहेत. मात्र स्वतःचा जीव धोक्यात टाकणाऱ्या मराठी पोलिसांना अशा प्रकारची वागणूक ठाकरे सरकार देत आहे, त्याचा भाजप निषेध करत आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला एक विनंती देखील केली, जर तुम्ही पोलिसांचा सन्मान करू शकत नसतील तर त्यांचा अपमान देखील करू नका.
पोलिसांमध्ये नाराजीचे वातावरण
मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमधून त्यांच्या नावे डेबिट व क्रेडिट कार्डवर ७५० रुपये रकमेची खरेदी विनामूल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असलेल्या पोलीस कल्याण निधीतून दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांना चांगली रक्कम दिवाळी भेट देण्यात आली आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या बाबतीत सरकारने त्यांना ७५० रुपये भेट देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे. पोलिसांना तुटपूंजी भेट जाहीर केल्याने पोलिसांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
(हेही वाचा -एकेकाळी ‘मातोश्री’साठी विश्वासू बनलेले नीरज गुंडे आहेत तरी कोण?)