दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लुकलुकणारे दिवे, दारापुढे कंदिल, सुबक रांगोळी, फराळ, रोषणाई करून देशभर मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते.
धनत्रयोदशी
हिंदू पंचागानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी अर्थात धनतेरस साजरी केली जाते. यंदा 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते. या दिवशी धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते. खऱ्या अर्थाने या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. व्यापारी या दिवशी स्वतःच्या हिशोबाच्या वह्या, दुकाने, त्यामधील साहित्य या सर्वांची पूजा करतात. तसेच या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. या शब्दातील धन म्हणजे पैसा आणि तेरस हा तेरा अंकांशी संबंधित आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या तेराव्या दिवशी येतो.
(हेही वाचा -रंगीबेरंगी पणत्यांची आरास…)
पूजनाचा शुभ मुहूर्त…
सायंकाळी ५ ते ०६ वाजून ३० मिनिटांपर्यंत. याशिवय ०६ वाजून ४५ मिनिटांपासून ते रात्री ०८ वाजून ११ मिनिटांला शुभ मुहूर्त आहे.
भगवान धन्वंतरीच्या पूजेचा विधी…
धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी प्रतिमा एका चौरंग किंवा पाटावर ठेवावी. आपण पूर्वेकडे मूख असलेल्या अवस्थेत बसावे. हाता तिनदा पाणी घेऊन आचमन करून भगवान धन्वंतरीला आवाहन करावे. अक्षता, पुष्प, जल, दक्षिणा, वस्त्र, कलावा, धूप आणि दीप अर्पण करावे. यानंतर नैवेद्य दाखवावा. भगवान धन्वंतरीच्या मंत्राचा जप करावा. नंतर आरती करून दीपदान करावे.
भगवान धन्वंतरीचे मंत्र
- ॐ श्री धनवंतरै नम:
- ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:,
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय,
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप,
श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः
दागिने खरेदी
या दिवशी भगवान धन्वंतरीच्या पूजेबरोबरच घरभर दिवे लावले जातात. याशिवाय भांडी, चांदी किंवा सोन्याचे दागिनेही खरेदी केले जातात. दागिन्यांच्या खरेदीमुळे घरातील वाईट प्रवृत्तींचा नाश होऊन, सुख समृध्दी नांदते अशी धारणा आहे.
Join Our WhatsApp Community