महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. श्री तुळजा भवानी देवस्थानच्या अधिकृत वेबसाइट्सच्या तब्बल पाच तोतया वेबसाइट्स बनवून भक्तांकडून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. या बनावट वेबसाइट्स तुळजा भवानी मंदिरातील प्रसाद, अभिषेक, पूजा आणि इतर विधींसाठी भाविकांकडून पैसे गोळा करत आहेत.
राजकीय नेते सहभागी
पोलिसांनी 23 ऑक्टोबर रोजी एफआयआर नोंदवला आहे. पण एफआयआर नोंदवून आठ दिवस उलटूनही संबंधित वेब डेव्हलपर्स आणि बनावट साइट अॅडमिनिस्ट्रेटरचे सेल क्रमांक त्या वेबसाइट्सवर स्पष्टपणे नमूद असतानाही, जिल्हा पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. या बोगस वेबसाइट प्रकरणाशी संबंधित प्रत्येक जण प्रश्न टाळून मौन पाळत आहे. या ऑनलाइन घोटाळ्यात सत्ताधारी पक्षामधील काही राजकीय नेते सामील असल्याचा आरोप एका स्थानिक भाजप नेत्याने केला आहे.
(हेही वाचा : शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्ताने चक्क ईदच्या शुभेच्छा!)
भाजपाचा निषेध
गुन्हेगारांकडून बनावट वेबसाईट तयार करून भाविकांची फसवणूक केल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. राज्य सरकारने तात्काळ दोषींना पकडावे आणि आधीच महामारीमुळे होरपळत असलेल्या भाविकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community