ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर देशात दहशतवादी हल्ला करण्याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मोठा डाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तोयबाकडून उत्तर प्रदेशातील महत्त्वाची रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी यासंदर्भातील चिठ्ठी हापुड रेल्वे स्थानकाच्या अधिक्षकांकडे पाठवली आहे. या धक्कादायक माहितीनंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
एकूण ४६ स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी
या मोठ्या प्लानमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री चिठ्ठी उत्तर प्रदेशातील हापुड रेल्वे स्थानकांच्या अधिक्षकांना मिळाली आहे. यामधील एकूण ४६ रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या चिठ्ठीनंतर उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून प्रवाशांची तपासणी देखील कसून केली जात आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेसह जीआरपी, आरपीएफ आणि डॉग स्कॉड देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.
(हेही वाचा- पंढरपूरातील माऊलींच्या गावी २३ बियर शॉपींना मंजूरी)
या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेकडून उत्तर प्रदेशातील तब्बल ४६ रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट करण्याचा डाव रचला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीपत्रात लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, कानपूर आणि गोरखपूर सारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची नावे आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर आता ट्रेनमधील तपासणी देखील वाढवण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा रक्षक देखील अलर्ट मोडवर असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community