मुंबई महापालिकेच्या मंड्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या कोळी भगिनींना मासे साठवणुकीसाठी पर्यावरणपूरक प्लास्टिक शीत कंटेनरचे वाटप करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी निर्णय घेण्यात आला. परंतु आधी कंटेनर खरेदीतील त्रुटी आणि त्यानंतर कोविडचा आजार यामुळे या वाटपाला खिळ बसली आहे, तरी दीड वर्षांपूर्वी याबाबत सुधारीत निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी तीन कंटेनरसाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च केले जाणार होते, परंतु दोन वर्षांमध्ये या कंटेनरचे वितरण योग्यप्रकारे कोळी भगिणींना करता न आल्याने यावरील खर्च आता प्रत्येकी साडेतीन हजारांनी वाढले आहे. तीन कंटेनरच्या संचासाठी आता महापालिका १३ हजार ५५५ रुपये खर्च करणार आहे.
लाभ देण्यात प्रशासनाला सपशेल अपयश
राज्यात प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर मासे साठवणुकीसाठी थर्माकोल बॉक्सचा वापर करणाऱ्या कोळणींना पर्यावरणपूरक कंटेनर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रस्ताव २०१९ मध्ये मंजूर करण्यात आल्यानंतर त्यातील काही त्रुटी लक्षात घेता मार्च २०२० मध्ये स्थायी समितीने अर्थसहाय्य देण्यास मान्यता दिली. त्यामध्ये ५०, ६० व ७० लिटरच्या प्लास्टिक कंटेनरचा थेट लाभ हस्तांतरण धोरणानुसार वितरीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मागील वर्षी मुंबईतील महापालिकेच्या मंडईतील ३७४१ कोळी भगिनींपैकी केवळ ५७८ कोळणींनाच या कंटेनर करता अर्थसहाय देण्यात आले आहे. तर १४८ कोळी महिला या मुंबई बाहेरील रहिवाशी असल्याने तसेच परवान्याचे नुतनीकरण न केल्याने त्या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. मात्र, आता ही अट प्रशासनाने शिथिल करण्याचा निर्णय घेतला असला तरी महापालिकेच्या मंडईतील कोळणींना याचा लाभ देण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचा -पंढरपूरातील माऊलींच्या गावी २३ बियर शॉपींना मंजूरी)
४.२८ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित
त्यानुसार तिन्ही कंटेनरसाठी १३ हजार ५५५ रुपये किंवा प्रत्यक्ष खरेदी करण्यात आलेली रक्कम यापैकी कमी असलेल्या किंमतीचे कंटेनर वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. एक वर्षांपूर्वी जेव्हा स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली होती, त्यात या कंटेनर ऐवजी कोळणींना पैसे देण्यात मान्यता दिली होती. यामध्ये ५०, ६० व ७० लिटरच्या कंटेनरसाठी अनुक्रमे २३०० रुपये, ३१५० रुपये आणि ४५५० रुपये याप्रमाणे एकूण १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ३.७४ कोटी रुपये खर्च केले जाणार होता. यामध्ये ३७४१ कोळणींना दिला जाणार होता. तर आता नियोजन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून यामध्ये ५०, ६० व ७० लिटर कंटेनरसाठी अनुक्रमे २९३० रुपये, ४००१ रुपये आणि ६६२४ रुपये अशाप्रकारे खर्च अपेक्षित मानला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या प्रस्तावात ३.७४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता तर आता हा खर्च ४.२८ कोटी रुपये एवढा अपेक्षित मानला जात आहे.
Join Our WhatsApp Community