शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्ताने चक्क ईदच्या शुभेच्छा!

रोषणाईची संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची असल्याने साहजिकच यामुळे मनसे आता सर्वसामान्यांच्या टीकेची धनी बनली आहे. 

261
दादर येथील सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पूर्वीचे शिवाजी पार्क हा शिवसेनेचा बालेकिल्ला, मनसेचा हुकमाचा एक्का! यंदा दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांनी हा परिसर अक्षरशः दिव्यांच्या रोषणाईने आणि कंदिलाने उजळवून टाकला आहे. एकमेकांवर मात करण्याच्या नादात एक महाभयंकर प्रकार इथे घडला आहे. या ठिकाणी दिव्यांच्या माळांची आरास करण्यात आली आहे आणि त्यामधून दीपावलीच्या शुभेच्छा देण्याऐवजी चक्क ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मनसेची झाली गोची!

या ठिकाणी आधीच शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून कायमस्वरूपाची दिव्यांची रोषणाई केली आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी मनसेने इथे यंदा काकणभर जास्तच दिव्यांची रोषणाई केली आहे. हे करताना मनसेने झाडांवरून विद्युत दिव्यांच्या माळा खाली सोडल्या आहेत. त्यामधून एखाद्या चलचित्राप्रमाणे वाचता येतील, अशा प्रकारे दीपावलीच्या शुभेच्छा देण्याची संकल्पनाही अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात अक्षरे मात्र दीपावलीऐवजी ईदच्या शुभेच्छा देणारी दिसत आहेत. बघता बघता याचा व्हिडिओ बनवण्यात आला आणि चक्क तो सोशल मीडियात व्हायरल झाला. ही संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची असल्याने साहजिकच यामुळे मनसे आता सर्वसामान्यांच्या टीकेची धनी बनली आहे.

काय झाला नक्की प्रकार? 

या ठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही घोडचूक झाली असावी, असे बोलले आहे. मुंबईत विविध धर्मियांच्या सणांना रोषणाई करण्याचे कंत्राट घेतले जाते, जी रोषणाई ईदच्या दिवशी केली होती, त्याकरता ईदच्या शुभेच्छा देणारी सेटिंग करण्यात आली होती, ती सेटिंग न बदलता तीच लाईटिंग या ठिकाणी वापरण्यात आल्याने दिव्यांच्या माध्यमातून दीपावलीच्या जागी ईदच्या शुभेच्छा दिल्या जात असाव्यात असे बोलले जात आहे. दरम्यान याच मनसेचे दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना भवनासमोर ‘गर्व से कहो हम हिंदू है’, अशा आशयाचे बॅनर लावून प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता, त्या पार्श्वभूमीवर मनसेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र तर नाही ना, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.