शिवसेना भवनासमोर कंदील लावण्यावरून सेनेतच चढाओढ!

शिवसेनेतच कंदील लावण्यावरून चढाओढ सुरु

150

शिवसेना भवनसमोर कंदील लावण्यावरून शिवसेना आणि मनसेत कंदील वॉर सुरु असताना आता शिवसेनेतच कंदील लावण्यावरून चढाओढ सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना विभागप्रमुख आणि आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना भवन परिसरात सात ते आठ कंदील लावून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असला तरी यामधील भला मोठा असलेला आता सर्वांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा कंदील ठरत आहे.

‘हमसें बडा कौन’

शिवसेना भवनसमोरच शिवसेना नगरसेविका प्रिती पाटणकर आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी तब्बल ४०फूट उंचीचा कंदील लावला आहे. त्यामुळे आधी कंदील लावण्यावरून शिवसेना आणि मनसेत चढाओढ पहायला मिळत होती, परंतु पाटणकर यांनी मोठा कंदील लावत ‘हमसें बडा कौन’ असाच संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक दीपावलीमध्ये शिवसेना भवनसमोर कंदील लावण्यावरून आणि कमानी उभारण्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद उद्भवतात. तर यंदाही मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि शाखाध्यक्ष संतोष साळी यांनी सर्व प्रथम राम गणेश गडकरी चौकात मनसेचा कंदील लावला होता. त्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर, नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवन परिसरात सहा ते सात कंदील लावून हा परिसर भगवामय केला होता. त्यातच १९१च्या नगरसेविका व सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि शाखाप्रमुख अजित कदम यांनीही या विभागात कंदील लावल्याने शिवसेनेच्या कंदिलांची जत्राच भरल्याचे पहायला मिळत आहे.

शिवसेनेचा भगवा असून सेनाच मोठी!

मात्र आता यातच भर शिवसेनेच्या नव्या कंदिलाची पडली आहे. आतापर्यंत शिवसेनेच्यावतीने जे कंदील लावण्यात आले आहेत, ते सर्व दहा फूटांचे आहेत. परंतु आता प्रभाग क्रमांक १९२च्या नगरसेविका प्रिती पाटणकर आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी तब्बल ४० फूट उंच आणि १४ फूट रुंदीचा भला मोठा कंदील लावला आहे. जो शिवसेना भवनसमोरील चौकात मध्यभागी लावण्यात आला आहे. जो कंदील सर्वांचे आकर्षण ठरत आहे. दादरमध्ये शिवसेनेचा भगवा असून शिवसेनाच मोठी असल्याचे या कंदिलाच्या माध्यमातून मनसे आणि भाजपला संदेश देण्यात आला आहे.

(हेही वाचा – अजित पवारांच्या अडचणी वाढल्या! कोणी केली कारवाई? )

‘मनसेला शिंगावरही घेण्यास तयार’

प्रकाश पाटणकर हे मनसेतून शिवसेनेत आले असून प्रभाग आरक्षण बदलल्याने त्यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यामध्ये प्रिती पाटणकर यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग आरक्षण बदलल्यास प्रकाश पाटणकर यांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यातच प्रकाश पाटणकर हे आमदारकीसाठी इच्छुक मानले जातात. तसेच पक्षाची जबाबदारी म्हणून ते विभागप्रमुख पदासाठीही इच्छुक मानले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पाटणकर यांनी हा भला मोठा कंदील लावून आपली निष्ठा सिध्द करतानाच पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारायला तयार असून प्रसंगी मनसेला शिंगावरही घेण्यास तयार असल्याचाही संदेश या कंदिलाच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.