गुरुग्राम नमाज वाद: मुंबईच्या वाटेवर हरियाणा?

गुरुग्राम नमाज वादात 'विश्व हिंदू परिषदे'ची उडी; ३७ ठिकाणी नमाज करण्यास विरोध

108

राजधानी दिल्ली जवळील हरियाणाच्या गुरूग्राममध्ये शुक्रवारी हिंदू संघटनेकडून सार्वजनिक नमाज अदा करण्याला विरोध दर्शविण्यात आला होता. पोलिसांकडून शुक्रवारी एकूण ३७ ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यालाच विरोध दर्शवत हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसेंदिवस गुरुग्राममध्ये खुल्या जागेत होणाऱ्या नमाजला विरोध वाढत आहे. या खुल्या जागेत नमाज अदा करण्यास हिंदू संघटना सातत्याने विरोध दर्शविताना दिसत आहेत. आता या वादात विश्व हिंदू परिषदेनेही उडी घेतली आहे. खुल्या नमाजासाठी जी ३७ ठिकाणं आहेत, त्या सर्व ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेने जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईच्या वाटेवर हरियाणा वाटचाल करत आहे का? अशी चर्चा होताना दिसतेय. गेल्या काही वर्षांपूर्वी रस्त्यावर होणाऱ्या नमाजासाठी शिवसेनेने महाआरती सुरू केली होती. आज तोच मार्ग हरियाणातील हिंदू संघटनांनी स्वीकारला आहे. खुलेआम नमाज अदा केल्यास हिंदू देखील गोवर्धन पूजा करतील, असा इशारा संयुक्त हिंदू संघर्ष समितीने दिला आहे.

संयुक्त हिंदू संघर्ष समिती ही हरियाणातील विविध हिंदू संघटनांची संघटना आहे. राज्यात खुल्या जागी नमाज अदा करताना सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता गेल्या अनेक वर्षांपासून याला विरोध करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने हिंदू संघटनांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याने आता खुल्या जागेत होणारे नमाज बंद न झाल्यास ५ नोव्हेंबरपासून संयुक्त हिंदू संघर्ष समिती गुरुग्रामच्या सेक्टर १२ मध्ये गोवर्धन पूजा करणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

जुना वाद पुन्हा?

हरियाणात खुल्या ठिकाणी नमाज अदा करण्याची प्रथा फार जुनी आहे. २०१८ मध्ये गुरुग्राममध्ये १२५ ठिकाणी खुले नमाज आयोजित करण्यात आले होते, तेव्हा देखील वाद निर्माण झाला होता. तेथील स्थानिक लोकांना याचा अडथळा व्हायचा, त्यामुळे याला लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मे २०१८ मध्ये पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजाची संयुक्त बैठक पार पडली होती. ज्यामध्ये १२५ ठिकाणांऐवजी केवळ ३७ ठिकाणी खुल्या जागेत नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली होती.

(हेही वाचा -अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात; ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी)

२९ वर्षांपूर्वी सेनेने केली होती महाआरती

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण २९ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावर महाआरती करण्याची घोषणा केली होती. यावेळी बाबरीचा विध्वंस झाला होता. देशाच्या विविध भागात दंगलीदेखील उसळल्या होत्या. अशा परिस्थितीत हिंदूंना एकत्र करून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शिवसेनेने रस्त्यावर महाआरती करण्याचे जाहीर केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.