एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर एकीकडे एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक आरोप करत असताना दुसरीकडे त्यांना समाजातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी शिवप्रतिष्ठान संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
नवाब मलिकांवर कारवाईची मागणी
शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा थेट एनसीबीच्या कार्यालयाबाहेर सत्कार केला. समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी असून त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे चौगुले म्हणाले. तसेच अशा अधिकाऱ्यावर बिनबुडाचे आरोप करणारे नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. समीर वानखेडे कार्यालयात येताच त्यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. समीर वानखेडेंना यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही भेट म्हणून देण्यात आली.
हर हर महादेव घोषणा
यावेळी हर हर महादेव या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जे अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करु पाहत आहेत. पण महाराष्ट्रात काही वृत्ती अशा आहेत ज्या वानखेडेंविरोधात आहेत. मी मंत्री नवाब मलिक यांचा निषेध करतो तसेच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करतो. आमची संघटना राष्ट्रहितार्थ काम करणारी संघटना आहे. राष्ट्राच्या हितासाठी जे जे कुणी काम करत असतील त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आमचे काम आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. बाकीच्या हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका ते मांडतील, असेही नितीन चौगुले म्हणाले.
कोणी कोणी दिला पाठिंबा?
- समीर वानखेडे यांना याआधी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी पाठिंबा दिला आहे. वानखेडे यांच्याकडे असलेले जात प्रमाणपत्र योग्य असल्याचे ते म्हणाले.
- समीर वानखेडे यांचे कुटुंबीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भेटले. त्यावेळी वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र दाखवले, तसेच ते दलित हिंदू असल्याचे सर्व पुरावे दिले. तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनीही समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला.