दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लुकलुकणारे दिवे, दारापुढे कंदील, सुबक रांगोळी, फराळ, रोषणाई करून देशभर मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते.
भाऊबीज
दिवाळीचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला `यमद्वितिया` असेही म्हटले जाते. रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीज देखील संपूर्ण भारतात आनंदाने साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
भावाचे औक्षण
भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यानंतर एकमेकांना भेटवस्तू देऊन हा सण साजरा केला जातो. अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीप दान करतात. एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. भाऊ आणि बहिणीच्या या खास नात्याला समर्पित भाऊबीजचा हा सण खूप महत्वाचा आहे. भाऊ आणि बहिणीमध्ये प्रेम आणि मायेचा प्रवाह अखंड चालू ठेवणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे.
Join Our WhatsApp Community