काँग्रेस दुबळी झाली की संपली असे बोलणाऱयांना हाताच्या पंजाने चपराक मारली आहे. बिहारात नितीश कुमारांनी दोन्ही जागा जिंकल्या. आसामात भाजपने 5 जागा जिंकल्या. मध्य प्रदेशातही भाजपने जागा राखल्या हे खरे, पण तेरा राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल त्यांनी दिवाळी साजरी करून नाचावे, असे लागलेले नाहीत. महागाईने लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत व लोकांनी महागाईविरोधात मतदान केले, असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. याचा स्पष्ट अर्थ असा की, फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला आहे, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली.
मोदींशिवाय सेनेने जिंकली निवडणूक
लोकांना भेडसावणारे प्रश्न निवडणुकांचे निकाल बदलतात. हिंदी पट्ट्यात भाजपविरोधी वातावरण आहे हेसुद्धा दिसते. महाराष्ट्रातील भाजपवाले एक तुणतुणे कायम वाजवत असतात, मोदींमुळे शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. त्यांच्यासाठी दादरा-नगर हवेलीचा शिवसेना विजय सत्यकथन करतोय. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे. दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देश पातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
(हेही वाचा : आली दिवाळी, मुंबईची हवा ‘बिघडली’)
दादर ते दादरा प्रवास
दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल तेच सांगतात. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना जोरदार विजयी झाली आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे. मोहनभाई डेलकर हे दादरा-नगर हवेलीचे लोकनेते होते. सात वेळा ते याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. या संपूर्ण भागावर त्यांचा प्रभाव होता हे नक्कीच. ते हिंमतबाज लढवय्ये होते, पण केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या सनकी तानाशाही कार्यपद्धतीस विरोध करणाऱया डेलकरांना मानसिक ताणतणाव असह्य झाला व शेवटी मुंबईत येऊन त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. सात वेळा निवडून आलेला एक खासदार प्रशासनाच्या हुकूमशाहीस कंटाळून आत्महत्या करतो ही देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लाजिरवाणीच घटना होती. डेलकर यांच्या आत्महत्येने फक्त दादरा-नगर हवेलीचीच जनता नव्हे, तर महाराष्ट्र-गुजरातला धक्का बसला. डेलकर कुटुंब त्या धक्क्यातून सावरेल काय? हा प्रश्न होताच, पण शेवटी शिवसेनेच्या आधारात डेलकर कुटुंब आणि तेथील जनता अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाली. त्याच लढय़ाची पहिली ठिणगी म्हणून कलाबेन डेलकर यांच्या विजयाकडे पाहिले पाहिजे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची पहिली विजय पताका फडकली आहे व त्या विजय पताकांचे राष्ट्रीय तोरण झाल्याशिवाय राहणार नाही. कलाबेन डेलकर या 51,269 इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. हा विजय ऐतिहासिक आहे. मुंबईतील ‘दादर’ ते ‘दादरा’ असा हा शिवसेनेचा प्रवास सुरु आहे, असेही सेनेने म्हटले.
Join Our WhatsApp Community