बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या दिवाळखोरीला प्रशासकीय अधिकारीच जबाबदार असून प्रतिष्ठानचे प्रमुख लेखापाल रमाकांत सावंत यांच्या लेखा विभागातील अल्प ज्ञान आणि चुकीच्या निर्णयाला त्यांनी दुजोरा दिल्यानेच आज ही परिस्थिती सर्व कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे. त्यामुळे त्यांना लेखा विभागातून सेवामुक्त करुन एका प्रामाणिक अधिकाऱ्याची किंवा लेखा विभागाचे संपूर्ण ज्ञान असलेल्या प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
तसेच देवेंद्र कुमार जैन यांची प्रतिष्ठानमधील नियुक्ती बेकायदेशीर असल्याने त्यांच्या नियुक्तीची चौकशी करुन प्रतिष्ठानचे खासगीकरण करण्यामध्ये विशेष पुढाकार घेत असल्याने त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
(हेही वाचाः शीव-माटुंग्यात पाणीबाणी! हंडाभर पाण्यासाठी भाजपकडून सहायक आयुक्तांना निवेदन)
खासगीकरणाचा डाव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या खासगीकरणाची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. खासगीकरण करून येथील सुमारे २००हून अधिक कर्मचाऱ्यांना देशोधडीस लावण्याचे छुपे कारस्थान रचले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देत प्रतिष्ठानमधील सत्य समोर आणण्याचे काम केले आहे.
कारवाईची गरज
अंधेरी आणि मुलुंडमधील दोन्ही क्रीडा संकुलांमध्ये दिल्या जाणा-या विविध सुविधांमार्फत जमा झालेले उत्पन्न व संकुलाच्या व कर्मचाऱ्यांना भविष्यात येणाऱ्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी, प्रशासनाने ठेवलेली अनेक राष्ट्रीयकृत बँकांमधील मुदत ठेवीतील रक्कम खर्च झाली. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही राणे यांनी केली आहे. तसेच संकुलाच्या व कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत खेळ मांडणा-या प्रशासनातील नतद्रष्ट अधिकाऱ्यांवर विनाविलंब योग्य ती कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः मुंबईकरांनो, वाचा कोरोना लसीकरणासंदर्भात महत्वाची बातमी)
क्रीडा संकुले धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव
पुढील १५ वर्षांसाठी मुंबई महापलिकेच्या सहकार्याने अंधेरी व मुलुंड येथील दोन्ही क्रीडा संकुले नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रतिष्ठानाला चालवण्यास दिलेले असतानाही, विशेष कार्य अधिकारी देवेंद्र कुमार जैन हे लेखापाल व उपमुख्य प्रशासकीय अधिकारी रमाकांत सावंत, प्रशासकीय अधिकारी (प्रभारी) गणेश देवकर, सहायक लेखापाल नंदकुमार नाईक यांच्या संगनमताने विश्वस्तांना व मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला चुकीची माहिती देऊन व दिशाभूल करत मनमानी करत आहेत. टप्प्याटप्प्याने दोन्ही संकुलांतील विविध विभागांचे खासगीकरण करण्यासाठी खासगी कंपन्यांशी संगनमत करून चुकीची निविदा प्रक्रिया राबवत आहेत. तसेच दोन्ही क्रीडा संकुले पुढील पंधरा वर्षांसाठी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा घाट त्यांनी घातला आहे. तो त्वरीत थांबला पाहिजे, असेही नितेश राणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आर्थिक लाभ देऊ नका
मागील २५ वर्षांपासून प्रमुख लेखापाल व उपमुख्य प्रशासकीय अधिकारी रमाकांत सावंत प्रतिष्ठानच्या विविध पदांवर काम करत असून, प्रतिष्ठानच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीला स्वत: सावंत आणि त्यांचा लेखा विभाग जबाबदार आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रतिष्ठानची जमा झालेली रक्कम कुठे व कधी खर्ची झाली याची सविस्तर माहिती मिळत नाही तोपर्यंत रमाकांत सावंत यांना सेवानिवृत्ती नंतरचे मिळणारे सर्वप्रकारचे आर्थिक लाभ त्यांना देण्यात येऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः फोर्टमधील ‘या’ तीन वाहनतळांमध्ये ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन’)
Join Our WhatsApp Community