गोरेगाव येथील आरे वसाहतीत माणसांवर हल्ले करणा-या मादी बिबट्याला पकडण्यात अखेर बुधवारी सायंकाळी वनविभागाला यश आले. मात्र गेल्या दोन महिन्यांत नऊ हल्ले करणा-या या मादी बिबट्याला पुन्हा जंगलात सोडण्याची शक्यता कमी असल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)सुनील लिमये यांनी दिली आहे.
दोन महिने देत होती चकवा
आरेतच जन्मलेल्या सी-३२ या मादी बिबट्याला पकडण्यात गेल्या दोन महिन्यांत वनविभागाची तसेच कॅमेरा ट्रॅप पद्धतीने आरेतील बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणा-या स्वयंसेवकांची दमछाक झाली होती. कारण या अगोदरच्या तीन कॅमेरा ट्रॅपमध्ये या मादी बिबट्याची बहीण आणि आई अडकली होती. हल्लेखोर मादी बिबट्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आपले दर्शन देत होती, मात्र पिंज-याला ती चकवा देत होती. तिस-या हल्ल्याच्यावेळी हल्लेखोर बिबट्या ही सी-३२ असल्याचे निष्पन्न झाले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बिबट्या पकडण्याचा निर्णय घेतल्यानंतरही कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसणारी सी-३२ पिंज-यात अडकत नव्हती.
(हेही वाचाः …अन् शिवाजी पार्कात पुन्हा जुळले नात्यांचे बंध)
दोन बहिणींची एकत्र संगत
सी-३२ आणि सी-३३ अशा दोन बहिणी एकत्र सोबत असायच्या. त्यामुळे हल्ला नेमका कोण करतंय, हे शोधणं आव्हानात्मक असल्याची माहिती कॅमेरा ट्रॅपिंगसाठी वनविभागाला मदत करणारे स्वयंसेवक कौशल दुबे यांनी दिली.
वाढत्या हल्ल्यांमुळे दुपारी चार वाजल्यापासूनच स्वयंसेवक कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचाली शोधायला जायचे. तसेच वनविभागाची गस्तही वाढली होती.
केला होता वृद्ध महिलेवर हल्ला
दरवेळी बिबट्याला पकडल्यानंतर त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गर्दी उसळायची. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने पकडलेल्या बिबट्यांना सुखरुप गर्दीतून बाहेर काढल्याचेही दुबे म्हणाले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला घराच्या व्हरांड्यात बसलेल्या वृद्ध महिलेवर या मादी बिबट्याने हल्ला चढवला. त्यावेळी घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमे-यातील दृष्ये सामाजिक माध्यमांवर मोठ्या संख्येने व्हायरल झाली.
(हेही वाचाः ‘त्या’ प्रकरणात मुंबई एसआयटी करणार गुन्हा दाखल )
आईपासून दुरावल्याने भक्ष्य मिळणे अवघड
सी-३२ आणि सी-३३ या दोन्ही मादी बिबट्या आईपासून विभक्त झाल्या होत्या. त्यामुळे आपले भक्ष्य मिळवण्याच्या धडपडीत सी-३२ने माणसांवर हल्ले केल्याचा अंदाज राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Communityपकडलेला हल्लेखोर मादी बिबट्या ही मुळात माणसांचा वावर जास्त असलेल्या ठिकाणीच जन्मला आली. त्यामुळे तिला माणसांचा वावर फारसा नवा नाही. तिची शारिरीक तपासणी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु आहे. मात्र सर्व बाजूंनी निर्णय घेतल्यानंतर वनविभागाच्या समितीकडून बिबट्याला सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
-सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र