येत्या ३ दिवसांत राज्यात पाऊस! ‘या’ १२ जिल्ह्यांना हाय अलर्ट

118

पाऊस राज्यातून जाण्याचे नाव घेत नाही. आता सध्या लक्षद्विप आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवेच्या कमी दाबाचे हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर रविवारीपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज पुण्यासह एकूण १२ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इथे पावसाचा असणार धुमाकूळ

शुक्रवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक,आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. शनिवारी राज्यात पावसाचा जोर मंदावणार असून कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. शनिवारी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.