राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी सुरु असताना शुक्रवारी मध्यरात्री मुंबईसह नजीकच्या भागांत पावसाचे आगमन झाले. शनिवारी सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात ढगाळ वातावरण असल्याने एरव्हीच्या घामाच्या धारांना, दुपारच्या उन्हाच्या तडाख्यांना जरा ब्रेक मिळाल्याने सर्वांनी सुस्कारा सोडला. रविवारपर्यंत मुंबईत ढगाळ वातावरण राहील आणि थोडाफार पाऊस होईल, असा अंदाज आहे.
१० मी.मी. पावसाची नोंद
मुंबईत नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पहिल्यांदा पाऊस पडला. अंधेरीत मध्यरात्री दोनच्या सुमारास पाऊस सुरु झाला. अर्ध्या तासानंतर पावसाची रिपरिप थांबली. सांताक्रूझ, विलेपार्ले या ठिकाणीही मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. सकाळच्या पहिल्या प्रहारात काही ठिकाणी रिपरिप सुरु होती. मात्र दुपारी बाराच्या प्रहारातही रोजच्या तीव्र सूर्य किरणांच्याऐवजी मुंबईकरांना कोवळे ऊन अनुभवायला मिळाले. सकाळी साडेआठच्या नोंदीत मुंबईत गेल्या चोवीस तासांत १० मी.मी. पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून दूर जात आहे. परंतु येत्या २४ तासांत तीव्र होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी व नजीकच्या भागांत या बदलाचा प्रभाव दिसून येत आहे. मुंबई व ठाण्यात आकाश ढगाळलेले राहील, परंतु पावसाची शक्यता आहे.
– के.एस. होसाळीकर, ‘जी’ शास्त्रज्ञ, एसआयडी विभाग प्रमुख, वातावरणीय बदल आणि सेवा, भारतीय हवामान खाते.
उत्तर मध्य महाराष्ट्र, कोल्हापुरातही पावसाची हजेरी
उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाने शुक्रवारपासून चांगलीच हजेरी लावली. सकाळच्या साडेआठच्या नोंदीत नाशिकला १३.८ मी.मी., त्र्यंबकेश्वरला ११ मी.मी., वेळुंजेला २७ मी.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापुरात आजरा येथे १८ मी.मी., मलिग्रे १९ मी.मी., उतुर ४ मी.मी., गवसे येथे २२ मी.मी. पाऊस झाला, अशी माहितीही हवामान खात्याने दिली.
(हेही वाचा : क्रूझवरील कारवाई राष्ट्रवादीचाच ‘प्लॅन’, सूत्रधार सुनील पाटील!)
Join Our WhatsApp Community