मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांचा वाढलेला आकडा पुन्हा दिवाळीत वाढेल की काय, अशी जी भीती व्यक्त केली जात होती, ती भीती काहीशी कमी करणारी सुखद बातमी भाऊबीजेच्या दिवशी ऐकायला मिळाली आहे. दिवसभरात कोविड बाधित रुग्णांची संख्या १७६ एवढी आढळून आली आहे. आजवरच्या दोन्ही लाटेतील ही सर्वात नीचांकी रुग्ण संख्या मानली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारी ही सुखद बातमी मानली जात आहे.
चार रुग्णांचा मृत्यू
शुक्रवारी दिवसभरात जिथे २४ हजार ९०१ चाचणी करण्यात आल्यानंतर २३८ बाधित रुग्ण आले होते. आणि ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्या तुलनेत शनिवारी २५ हजार ४३१ चाचणी केल्यानंतर १७६ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात विविध जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ३ हजार ०३१ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. मृत्यू पावलेल्यांमध्ये चारही रुग्ण या महिला आहेत.
(हेही वाचा : पुन्हा रुग्णालयाला आग! नगरमध्ये १० रुग्णांचा मृत्यू)
बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के
दोन रुग्णांचे वय हे ६० वर्षांच्या वर होते. उर्वरित २ रुग्णांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा असून मागील आठवड्यात मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा ०.०३ टक्के हा आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,९४३ एवढा आहे. मुंबईतील झोपडपट्टी व चाळींमधील सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शून्यावरच असून इमारतींची संख्या २० एवढी आहे.
Join Our WhatsApp Community