जमिनीखालील उष्णता सरपटणा-या प्राण्यांसाठी होतेय असह्य

ऑक्टोबर हीटचा तडाखा आताही सुरु आहे. त्यामुळे सरटणा-या प्राण्यांना जमिनीत थंडावा मिळत नाही.

138

ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरुच असल्याने मुलुंड आणि ठाणे परिसरात जंगलांच्या नजीक नागरी वसाहतींमध्ये आता सापांचे दर्शन होऊ लागले आहे. ठाण्यात स्कूटीमध्ये कोब्रा, तर मुलुंडमध्ये चक्क गाडीचा बंपरमध्ये दहा फूटांचा अजगर दिसून आला.

कोब्रा स्कूटीत लपला

गुरुवारी दिवसाला ठाण्यात लोकमान्य नगर परिसरातील स्कूटीमध्ये अडीच फुटांचा कोब्रा अडकल्याचे रहिवाशांना समजले. ही दुचाकी वापरात नव्हती, शिवाय मालकाचाही शोध लागला नाही. शेवटी जमावाने स्वतःहून स्कूटीत अडकलेल्या कोब्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कोब्राच्या दंशाच्या भीतीपोटी त्यांनी स्कूटीला बॅटने मारण्यास सुरुवात केली. बॅट जोरात लागल्याने कोब्रा अजूनच अडगळीच्या ठिकाणी खाली गेला. अखेर रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेच्या मदतीने कोब्राला बाहेर काढण्यात आले. संस्थेच्या अमन सिंग या प्राणीप्रेमीला स्कूटीतील अडकेला कोब्रा पाहताच त्याला जबर जखम झाल्याचे दिसले. कोब्रा स्कूटीतून सुखरुप बाहेर काढल्यानंतर त्याच्या त्वचेला खरचटल्याचे आढळले. कोब्रा अस्वस्थ असून,त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती ‘रॉ’ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी सरपटणारा प्राणी आढळला की, माणसे स्वतःहून प्राण्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बचाव कसा करावा हे माहीत नसते. मदत करताना कित्येकदा सरपटणा-या प्राण्यालाच जखमा होतात. रहिवाशांनी प्राण्याच्या बचावासाठी प्राणीप्रेमी संस्थेला किंवा वनविभागाची मदत घ्यावी.
– पवन शर्मा, संस्थापक, रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ)

(हेही वाचा : कांदिवलीत पणतीनेच घर पेटले: २ जण जखमी)

कारच्या बंपरमध्ये अजगर आढळला

शुक्रवारी मध्यरात्री मुलुंडच्या सिल्व्हर बेल्स सोसायटीतील कारच्या बंपरमध्ये अजगर आढळून आला. ही घटना रहिवाशांना मध्यरात्री दीड वाजता समजली. ‘रॉ’ या प्राणीप्रेमी संस्थेचे सागर पंधी, शुभम सोनी आणि अमन सिंग यांना वीस किलोच्या अजगराला सुखरुप बाहेर काढायला तब्बल तीन तास लागले. ठाण्यातील घटनेप्रमाणे अजगराला काही जखमा दिसून आल्या नाहीत. अजगराला तत्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

का होतेय सरपटणा-या प्राण्यांचे दर्शन?

ऑक्टोबर हीटचा तडाखा आताही सुरु आहे. त्यामुळे सरटणा-या प्राण्यांना जमिनीत थंडावा मिळत नाही. थंडाव्यासाठी सरपटणारे प्राणी जमिनीबाहेर येतात, असे रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ)चे संस्थापक पवन शर्मा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.