रायगडमध्ये पाच मजली इमारत कोसळली, ७० ते ८० जण अडकल्याची शक्यता

251

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ७० ते ८० नागरिक अडकले असल्याची शक्यता आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत.

४५ ते ४७ फ्लॅटची इमारत 

काजळपुरा भागातील ‘तारीक गार्डन’ नावाची इमारत कोसळली असून या इमारतीत ४५ ते ४७ फ्लॅट होते. त्यातील ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री हे खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या संपर्कात असून, बचावकार्याची माहिती घेत आहेत.

 

सदर इमारत ५ मजल्यांची होती. त्यातले वरचे ३ मजले कोसळले आहेत. बचाव पथकाला २० ते २५ नागरिकांना बाहेर काढण्यास यश आले आहे. इमारतीत ४८ ते ५० कुटुंब राहत असून, २००हून जास्त नागरिक राहात असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर पोलीस यंत्रणा देखील पोहोचली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात पोहोचवण्याचं काम सुरू आहे. इमारतीला आधी कुठला इशारा दिला होता किंवा काय याचा तपशील पाहावा लागेल. आसपासच्या इमारतींची परिस्थिती देखील तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारत काही फार जुनी नाही.

आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.