कांदिवलीतील ‘त्या’ इमारतीची आगप्रतिबंधक यंत्रणाच बंद; अग्निशमन दलाची नोटीस

दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज

130

कांदिवली पश्चिम येथील ‘हंसा हेरिटेज’ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, ही आग लागल्यानंतर या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने या इमारतीच्या मालक तथा सोसायटीला नोटीस बजावण्यात येणार आहे.

अशी घडली घटना

कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही पंधरा मजल्याची इमारत असून चौदाव्या मजल्यावर ही आग लागली. दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे घरातील एलपीजी सिलिंडरचाही स्फोट झाला. यामध्ये हॉल व किचनमध्ये असलेल्या ९० वर्षीय रंजनाबेन पटेल आणि ६४ वर्षीय निता पारेख हे गंभीर झाले होते.त्यांना कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल केले असते तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

(हेही वाचा – धारावीत शुन्याची हॅट्रीक! सात दिवसांत ‘कोरोना’चे चारच रुग्ण)

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार!

मात्र ही आग लागल्यानंतर इमारतीतील आग प्रतिबंधक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग विझवण्यात विलंब झाला. याठिकाणी यंत्रणा असली तरी ती कार्यान्वित नव्हती. ही आग मोठ्या स्वरुपाची नसली तरी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने त्वरीत ती विझवण्यात यश आले नाही. अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर त्यांनी ही आपल्या यंत्रणांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना ५ बेडरुमध्ये असलेल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने या इमारतीच्या मालकांना तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अग्निशमन दलाच्यावतीने नोटीस बजावण्यात येणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी दिली आहे. हंसा हेरिटेज इमारतीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर या विभागातील सर्व इमारतींचा सर्वे करण्यात येणार असून या यंत्रणा कार्यान्वित करतानाच आग लागल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी मॉक ड्रिल करण्याच्याही सूचना अग्निशमन दलाच्यावतीने केल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.