पूर्व उपनगरांसाठी मोलाची देणगी ठरलेला पूर्व द्रुतगती मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वे हा सीएसएमटीपासून येतो तो चेंबूरला का थांबतो?, पुढे का जात नाही?, हा प्रश्न पूर्व भागात राहणाऱ्या अनेकांना कायम सतावत होता. भरधाव वेगाने यायचे आणि चेंबूरपासून मात्र रखडत रखडत पुढे जायचे, हे दुःख अनेक वर्षे पचवल्यावर आता एमएमआरडीएने यातून सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. हा द्रुतगती मार्ग चेंबूरपासून पुढे थेट घाटकोपरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कामराज नगर, रमाबाई कॉलनीही जोडणार
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. पूर्व द्रुतगती मार्गाला पुढे शिवाजी नगरपासून घाटकोपर सिग्नलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाढीव मार्ग कामराज नगर आणि रमाबाई कॉलनीलाही जोडणार आहे. याआधीदेखील हा प्रकल्प विचाराधीन होता, मात्र यामुळे कांदळवनांची हानी होणार म्हणून या प्रकल्पाला ब्रेक देण्यात आला होता. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने सीआरझेड संबंधी दिलेल्या निर्णयामुळे हा प्रकल्प पुन्हा विचाराधीन आल्याचे सूत्रांकडून समजते.
आराखडा तयार
या प्रकल्पाचा आराखडाही तयार झाला असून तो नगर विकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे. यामुळे थेट घाटकोपर ते ठाणे या दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार आहे. हा पूर्व द्रुतगती मार्ग २०१४ साली तयार करण्यात आला. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन संपादित करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community