मुंबई गुन्हे शाखेच्या ‘त्या’ दोन पोलिस निरीक्षकांना सीआयडीकडून अटक

138

मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. सीआयडीकडून ही पहिलीच अटक असून या गुन्ह्यात परमबीर सिंग पोलिस, उपायुक्त अकबर पठाण सह आठ जनांचा समावेश आहे.

एकूण आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली

ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल याने जुलै महिन्यात मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पोलिस उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, गुन्हे शाखेचे कक्ष ९ चे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके, संजय पाटील यांच्या सह दोन खाजगी इसम असे एकूण आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दरम्यान मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खंडणी, मारहाण करणे, खोटे दस्तावेज बनवणे, कट रचणे प्रकरणी गुन्हा दाखल करून संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोन खाजगी इसमाना अटक केली होती.

(हेही वाचा : …म्हणून भाजपवर सात वर्षे ‘मोदी-मोदी’ करण्याची वेळ! सेनेचा हल्लाबोल)

५० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप

या गुन्ह्यांच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून एक विशेष तपास पथक गठीत करण्यात आले होते. मात्र ठाणे आणि मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे एकाच स्वरूपाचे व या सर्व गुन्हयातील मुख्य आरोपी परमबीर सिंग असल्यामुळे ठाण्यातील ३ आणि मरीन ड्राईव्हचा १ असे एकूण ४ गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सप्टेंबर महिन्यात सोपवण्यात आला होता. सीआयडीकडून या गुन्ह्यातील साक्षी पुराव्यावरून सोमवारी पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकारी यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने तक्रारदार अग्रवाल यांच्या विरुद्ध जुहू पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई न करण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप असल्याची माहिती सीआयडीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

सीआयडीकडून अटक करण्यात आलेली ही पहिली अटक असून इतर आरोपीची भूमिका स्पष्ट झाल्यास त्यांना अटक होईल असे जगताप यांनी म्हटले आहे. अटक करण्यात आलेले नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना मंगळवारी मुंबईतील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ८वे न्यायालय मुंबई येथे हजर करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.