राज्यात मागील दीड वर्षांत वारंवार शासकीय रुग्णालयांना आगी लागून त्यामध्ये रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयांच्या अग्नि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीनंतर राज्य सरकारने राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट केले, त्यात अग्नि सुरक्षेबाबत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. मात्र त्यांच्या पूर्ततेसाठी जो निधी सरकारने देणे अपॆक्षित होते, तो अद्याप दिलेला नसल्याने या रुग्णालयांची अग्नि सुरक्षा वाऱ्यावर आहे.
मागील वर्षी भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. मात्र या रुग्णालयांत अग्नि सुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी जिल्हा विकास योजना वा सरकारकडून निधीच उपलब्ध करून न देण्यात आल्यामुळे अजूनही आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयात अग्नि सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात येऊ शकली नाही. त्याचाच परिणाम म्हणून परवा नगरमधील शासकीय रुग्णालयाला आग लागली आणि त्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा : राजकीय हितसंबंधांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला!)
४५० हून रुग्णालयांच्या कामांचे काम रखडले
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर विभागीय आयुक्तांची चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील शिफारशींनुसार आरोग्य विभागाने त्यांच्या अखत्यारीतील ५२६ रुग्णालयांपैकी ५१७ रुग्णालयांचे अग्निपरीक्षण करून घेतले, तसेच ४५० हून अधिक रुग्णालयांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून देण्याबाबतचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून दिले. तथापि, अनेक जिल्ह्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कामाचे अंदाजपत्रक दिले नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णालयांची सुरक्षा प्रलंबित!
ठाणे जिल्ह्यांत आरोग्य विभागाची एकूण १४ रुग्णालये असून या सर्व रुग्णालयांचे अग्निपरीक्षण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी अंदाजपत्रक देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केले त्यालाही तीन महिने उलटून गेले असून अद्यापि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अंदाजपत्रक आरोग्य विभागाला तयार करून दिलेले नाही. पालघर (१२), सिंधुदुर्ग (११), रत्नागिरी (१२), बुलढाणा (१८), नाशिक (३७), नंदुरबार (१५), जळगाव (२२) आणि अहमदनगर (२६) येथे आरोग्य विभागाची रुग्णालये असून यातील एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी जिल्हा विकास योजनेतून एक रुपयाही मिळाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव सांगितले.
Join Our WhatsApp Community