अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला शनिवारी लागलेल्या आगीनंतर आरोग्य विभागाने रुग्णालयातील तीन डॉक्टरांना निलंबित केले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ही कारवाई केली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे आणि डॉ. विशाखा शिंदे यांना आगीस जबाबदार धरत निलंबित करण्यात आले. रुग्णालयातील स्टाफ नर्स सपना पठारे यांनाही निलंबित करण्यात आले, तर स्टाफ नर्स आस्मा शेख चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. मात्र रुग्णालयांच्या अग्नि सुरक्षेचा विषय अजून प्रलंबित आहे, त्याचे काय केले, यावर आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर नाही.
चौकशी अहवालानंतर कारवाई
रविवारी टोपे यांनी रुग्णालयाची भेट घेत अपघाताची माहिती घेतली होती. यावेळी अपघाताचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याच्या सूचना टोपे यांनी दिल्या होत्या. अहवाल सादर झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन टोपे यांनी दिले होते. मात्र राज्यातील रुग्णालयांतील वाढत्या आगीच्या सत्रावरुन सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सोमवारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांवर कारवाई केल्याचे टोपे यांनी जाहीर केले.
(हेही वाचा : राजकीय हितसंबंधांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला!)
काय आहे प्रकरण?
- अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामधील अतिदक्षता विभागाला शनिवारी आग लागली.
- अतिदक्षता विभागात कोरोनाचे सतरा रुग्ण उपचार घेत होते, या आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला.
- बहुतांश रुग्ण साठीच्या वयातले होते.
- सगळे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते आणि आगीमुळे व्हेंटिलेटरच बंद पडला, त्यातच अकरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- या संपूर्ण प्रकरणात अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांविरोधात जबरदस्त ताशेरे ओढले गेले. त्यांच्याविरोधात
- तक्रारींचा पाढा सुरु असतानाच शनिवारी आगीची घटना घडली. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.