मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत नवाब मलिकांचा जमीन व्यवहार

सरदार शाह बली खान हा टाडाचा आरोपी आहे. कायद्याने टाडाच्या आरोपीची सर्व मालमत्ता जप्त होते. ती मालमत्ता जप्त होऊ म्हणून मलिकांनी जमीन खरेदी केली का?, असा आरोप फडणवीस यांनी केला.

155

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह बली खान जो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा निकटवर्ती सलीम पटेल या दोघांकडून मंत्री नवाब मलिक यांनी जमीन कवडीमोल भावात खरेदी केली. सरदार शाह बली खान हा टाडा आरोपी आहे. कायद्याने अशा आरोपींची मालमत्ता जप्त केली जाते, ती जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन खरेदी केली, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोण आहेत सरदार खान आणि सलीम पटेल?

  • सरदार शाह बली खान हा १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तो सध्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने टायगर मेमनसोबत बॉम्बस्फोटासंबंधी मीटिंग घेतल्या. रिकाम्या गाड्यांमध्ये आरडीक्स भरणाऱ्यांमध्ये खान होता. त्याने स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका मुख्यालय या इमारतींची रेकी केली होती.
  •  महंमद अली पटेल उर्फ सलीम पटेल हा इफ्तार पार्टीला तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सोबत फोटोत दिसला तेव्हा चर्चेत आला होता. सलीम पटेल हा दाऊद सोबतच्या फोटोत दिसला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता.

(हेही वाचा : रुग्णालयांना आगी लागण्यामागे सरकारचा नाकर्तेपणा! काय आहे कारण?)

काय होता व्यवहार?

कुर्ल्यातील एलबीएस मार्ग येथील १ लाख २३ हजार चौ. फूट जमीन आहे, ती ३ एकराची जमीन सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. या व्यवहाराची पॉवर ऑफ ऍटर्नी सलीम पटेल नावावर आहे आणि जमिनीची विक्री शहा बली खान यांच्या नावाने केली. सॉलिडस कंपनीने ही जमीन विकत घेतली. या कंपनीत नवाब मलिक महत्वाच्या पदावर होते. ही कंपनी मलिक यांचा कुटुंबाची आहे. फराज मलिक यांच्या नावाने ही जमीन खरेदी करण्यात आली. फराज हे नवाब मलिक यांच्या रक्तातील नातलग आहे. २००५ मध्ये २ हजार रुपये चौ.फू. किमतीत ही जमीन खरेदी केली. ३० लाखात ही जमीन खरेदी केली, प्रत्यक्ष २० लाख रुपये दिले. त्यातील १५ लाख रुपये सलीम पटेलच्या खात्यात गेले. त्यावेळीच्या बाजारभावाच्या तुलनेत ही जमीन २५ रु. चौ. फू. मध्ये घेतली आणि प्रत्यक्ष १५ रुपये दिले. मुंबईच्या गुन्हेगारांकडून ज्याने मुंबईकरांच्या देहाच्या चिंधड्या केल्या, त्यांच्याकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली, असेही फडणवीस म्हणाले.

टाडाच्या आरोपीची जमीन वाचवली

सरदार शाह बली खान हा टाडाचा आरोपी आहे. कायद्याने टाडाच्या आरोपीची सर्व मालमत्ता जप्त होते. ती मालमत्ता जप्त होऊ म्हणून मलिकांनी जमीन खरेदी केली का?, असा आरोप फडणवीस यांनी केला. अशा प्रकारच्या ५ मालमत्ता आपल्या हाती लागल्या आहेत. यातील ४ व्यवहारात थेट अंडरवर्ल्डचा सहभाग आहे. हे सर्व पुरावे संबंधित यंत्रणांना आपण देणार आहे. त्यानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे. मलिकांचे संबंध आता अंडरवर्ल्डशी आहेत का, हे माहित नाही, असेही फडणवीस म्हणाले.

उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर दाऊद आणि बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता त्या आरोपाला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केलाय परंतु उद्या अंडरवर्ल्डचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ मुंबईत फोडून अंडरवर्ल्डच्या माध्यमातून मुंबई शहराला ‘ओलीस’ (हॉस्टेजेस) कसे ठेवले. एक व्यक्ती विदेशात बसून खंडणी कुणासाठी वसूल करत होता. तो अधिकारी कुणाचा खास होता याचा भांडाफोड उद्या (१० नोव्हेंबरला) करणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी नंतर फटाके फोडण्याची घोषणा केली होती परंतु त्यांचे फटाके भिजल्याने फटाक्यांचा आवाज झाला नाही फक्त वातावरण करण्यात आले, असे मलिक म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.