आरेतील बिबट्या आता वनविभागाच्या नजरेत

165

आरेत पकडलेल्या बिबट्याला अखेर ९ नोव्हेंबरला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रॅडिओ कॉलर बसवण्यात आले. रॅडिओ कॉलर बसवण्यात आलेली (सी३३) ही दोन वर्षांची मादी बिबट्या ही आरेत हल्ले करणा-या (सी३२)ची बहिण आहे. सी ३३चे लवकरच नामकरण करण्याचाही वनविभागाचा विचार आहे. सी ३३ ही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरेतूनच वनविभागाकडून जेरबंद झाली होती. सी ३२ पेक्षाही सी ३३ मादी बिबट्याला आईचा सहवास चांगला लाभला होता. त्यामुळे तिला शिकारीचे मूलभूत ज्ञान आहे. शरीराच्या तुलनेत सी३२ पेक्षाही तिचे वजन कमी असल्याची माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली. सी ३३ च्या स्वभावाची पूर्ण कल्पना येण्यासाठीच दुस-या टप्प्यातील रेडिओ कॉलरिंगसाठी निवडण्यात आले. भविष्यात आरेत बिबट्याचा हल्ला झाला तर सी ३३ हल्ल्याच्यावेळी जवळ होती का, याचा मागोवा रे़डिओ कॉलरिंगच्या माध्यमातून घेतला जाईल, त्यानंतरच सी ३३ बाबत निर्णय घेतला जाईल, असेही वनविभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.

रेडिओ कॉलरिंग बसवले

महाराष्ट्र वनविभाग आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी या संस्थेच्या सहकार्यातून बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करणयात येत आहे. यासाठी रेडिओ कॉलरिंगची पद्धत अवलंबण्यात येत आहे. बिबट्याला बेशुद्ध करुन मानेभोवती रेडिओ कॉलर लावले जाते. त्यानंतर शुध्दीत आल्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. सी ३३ मादी बिबट्याला मंगळवारी दुपारी १ ते ३ दरम्यान बेशुद्ध करुन रेडिओ कॉलर करण्यात आले. त्यानंतर सी ३३ शुध्दीत आल्यानंतर तब्बल सहा तास तिची पाहणी केली गेली. रात्री तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

(हेही वाचा- मुख्यमंत्र्यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास; दोन दिवसांत होणार शस्त्रक्रिया!)

रेडिओ कॉलरिंगचा जुगाड

दुस-या टप्प्यातील रेडिओ कॉलर्स उपलब्ध नसल्याने सी ३३ ला रेडिओ कॉलर्स बसवण्याचा कार्यक्रम लांबत होता. त्यामुळे जुन्नर येथील वनविभागाच्या बिबट्या पुनर्वसन केंद्रातील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या केंद्रीय वनविभागाशी संबंधित संस्थेचा रे़डिओ कॉलर मुंबईतल्या सी ३३ या मादी बिबट्यासाठी मागवले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.