गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणा-या एसटीचे कर्मचा-यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, त्यामुळे या कर्मचा-यांचा तळतळाट ठाकरे सरकारला भोगावा लागेल. जो पर्यंत विलिनीकरणाचा निर्णय होत नाही व परिवहन मंत्री आम्हाला याबाबत लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत एसटी कर्मचारी सरकारच्या कुठल्याही चर्चेला येणार नाहीत. मंत्री आझाद मैदानावर येऊन लेखी आश्वासन देईपर्यंत एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरुच राहणार असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
न्याय मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष
एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु केले. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. कर्मचा-यांच्या आवाज सध्या सरकारपर्यंत पोहचत नाही. परंतु आता कर्मचारी आपला आवाज इतका बुलंद करतील की त्या आवाजाने मंत्रालयात बसलेल्या मंत्र्यांना कानठळ्या बसतील व सरकारला एसटी महामंडळाचे विलिनीकरण करावेच लागेल असे ठाम प्रतिपादन प्रविण दरेकर यांनी केले.
हे भाजपाचे आंदोलन नाही
सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी दडपशाही केली जात असल्याचा आरोप करताना प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले की, एसटी कर्मचा-यांचे आंदोलन म्हणजे भाजपाचे आंदोलन नाही. आम्हाला नेतृत्वाची कोणतीही हौस नाही. महाराष्ट्रातील भाजपाच्या १०६ आमदारांचा या आंदोलनाला पाठींबा आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या सर्व युनियन व संघटनांना विनंती आहे की, तुमच्या पदाधिका-यांनी एसटी कर्मचा-यांना आझाद मैदानाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांची जाणूबुजून दिशाभूल करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कर्जबाजारीपणामुळे आतापर्यंत ३८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातच सरकारकडून कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. एकीकडे एसटी कर्मचा-यांच्या विरोधात न्यायालात अवमान याचिका दाखल करुन कर्मचा-यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करायची आणि दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी आम्ही तयार आहोत अशी दुटप्पी भूमिका सरकारकडून घेतली जात आहे. ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे दरेकर म्हणाले.
( हेही वाचा :‘ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड’, पडळकरांचा गंभीर आरोप )
अनिल परब यांच्यावर जोरदार टीका
किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा मिश्किल सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका. कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी खोचक टीकाही दरेकर यांनी केली. त्याचबरोबर मंत्रालयात बसलेल्यांना अजूनही जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी १०० वेळा उंबरठे झिजवायला आम्ही तयार आहोत. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
प्रविण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात
कोविड संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो. याच एसटी कर्मचा-यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला सेवा दिली. यामध्ये अनेक एसटी कर्मचा-यांना आपले प्राण कोरोनामुळे गमवावे लागले. तरीही सरकारला याची साधी कदर नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. मला कर्मचा-यांचे दु:ख माहित आहे, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. आझाद मैदानातील आंदोलनात आमदार गोपीचंद पडाळकर, भाजपचे नेते किरिट सोमैय्या, आमदार गिरिष महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे आदि सहभागी झाले होते. तत्पूर्वी आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणा-या एसची कर्मचा-यांना मानखुर्द येथील चेक पोस्ट वर पोलिसांनी अडवून ठेवले. आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी कर्मचा-यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने मानखुर्द येथे पोहोचले व आमदार खोत यांच्यासमवेत सुमारे साडे तीन तास त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु केले व सरकारच्या दडपशाहीचा दरेकर यांनी निषेध केला.
Join Our WhatsApp Community