एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज ठाकरेंची अट; म्हणाले…

एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ ‘राज’दरबारी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

105

राज्यातील एसटी कर्मचारी मागील काही दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ७ व्या वेतन आयोगानुसार पगार द्यावा तसेच थकीत वेतन लवकरात लवकर द्यावे, अशा विविध प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला असून अद्याप तो सुरूच आहे. या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. परंतु या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी एसटीच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना सुरूवातीलाच अट घातली.

अशी घातली अट

राज ठाकरे यांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यात होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात चिंता व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले की, “मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी होणाऱ्या आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल.”

‘राज’दरबारी शिष्टमंडळाने मांडल्या व्यथा

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंपुढे आपल्या व्यथा मांडल्यात. एसटीचे विलिनीकरण लागू होणारच नाही, तर आयोग लागू करुन द्या, पगार वाढवून द्या, अशा प्रमुख मागण्यांसह कर्मचाऱ्यांनी असेही म्हटले, आम्ही महाराष्ट्राची सेवा करत असून आमच्या पगाराच्या वेळेसच पैसे कसे नसतात, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. तसेच “साहेब, संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरी करत असताना आम्ही दिवाळीला दारात बसून होतो. आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. पाया पडतो हवं तर तुम्ही हा प्रश्न सोडवून द्या. विलिनिकरण कधी करायचं ते करा पण आयोग लागू करा,” अशी मागणीही एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

(हेही वाचा – कारवाईचे सत्र सुरूच! एसटी संपात आणखी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन)

…तर आत्महत्येचा आकडा वाढेल

राज ठाकरेंशी संवाद साधताना एसटी शिष्टमंडळाकडून भिती देखील वर्तवण्यात आली. ती म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भात प्रस्ताव मांडा, अर्थसंकल्पात तरतूद करा. आता पगार नाही मिळाला आणि अन्याय झाला तर ३७ आत्महत्या झाल्यात त्याचा आकडा वाढेल, अशी भितीही या एसटी अधिकाऱ्यांनी राज यांच्यासमोर व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.