मुलींचा जन्मदर वाढल्याने महाराष्ट्र राज्य कौतुकास पात्र ठरले. अलिकडेच झालेल्या केंद्रीय दत्तक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात दत्तक घेणा-या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मूल दत्तक घेताना जोडप्यांचा कल, मुलगी दत्तक घेण्याकडे अधिक असतो. सामाजिक जनजागृती, मुलींचे वाढते कर्तृत्व, शैक्षणिक प्रगती, सरकारच्या योजना यामुळे दत्तक घेताना मुलींना पसंती मिळत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात मुलांना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, २०२०-२१ मध्ये मुलींना दत्तक घण्याच्या संख्येत दीडपटीने वाढ झाली.
लिंगभेद खोडून काढला
२०२०-२१ मध्ये जोडप्यांनी दत्तक बालकांमध्ये मुलींना पसंती देत लिंगभेद खोडून काढला आहे. भारतात दत्तक प्रक्रिया सांभाळणारी संस्था सेंट्रल अॅडप्शन रिसोर्स ऑथॉरिटी (CARA) च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०१४ साली एकूण दत्तक घेतलेल्या १,०६८ बालकांमध्ये ५४३ मुले तर ५२५ मुली होत्या. २०२१ मध्ये ५९३ बालकांमध्ये दत्तक घेतलेल्यात मुलींची संख्या ३५४ आहे. वयोगट ० ते २ वर्षांच्या मुलींना जोडप्यांकडून प्राधान्य मिळत आहे.
( हेही वाचा : भारत-नेपाळ मैत्री ‘बस’ला पुन्हा हिरवा कंदील! )
दत्तकसंख्येत घट
भारतात बाळ दत्तक घेणाऱ्यांच्या संख्येत मागच्या दहा वर्षांत निम्म्याने घट झाली आहे. २०११ साली जवळपास सहा हजार बालकांना दत्तक घेण्यात आले होते. २०२१मध्ये ही संख्या अर्ध्यावर येऊन ३ हजार १४२ झाली आहे. यातही मुलींचे प्रमाण अधिक असणे ही, बाब सुखावणारी आहे. अलिकडे ही दत्तक प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे बालक बेकायदेशीररित्या दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
Join Our WhatsApp Community