मुंबई महापालिकेतील ‘भाईगिरी’ संपणार!

130

मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेत निवडून गेलेल्या आमदार रामदास कदम आणि भाई जगताप यांची सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत असून या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यापैंकी शिवसेना नेते रामदास (भाई) कदम यांना पुन्हा संधी देण्याच्या मनस्थितीत शिवसेना नसून काँग्रेसचे नगरसेवक नसल्याने भाई जगताप यांनाही पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नाराजीमुळे रामदास भाईंचा पत्ता कापला जाणार आहे तर नगरसेवक नसल्याने भाई जगताप यांचे विधान परिषदेतील आव्हानच संपुष्टात येत असल्याने मागील काही वर्षांपासून महापालिकेतून निवडून जाणाऱ्या दोन्ही भाईंची विधानपरिषदेतील भाईगिरीच आता संपणार आहे.

सन २०१६- १७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अर्थात मुंबई महापलिकेतून शिवसेनेकडून रामदास कदम आणि काँग्रेस कडून भाई जगताप हे विधान परिषदेत निवडून गेले होते. त्यावेळी काँग्रेसचे ५२ नगरसेवक होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ व समाजवादी पक्षाचे ०९ यासह मनसेचे २७ व अभासे दोन आणि इतरांची मदत घेऊन भाई जगताप विजयी झाले होते. तर भाजपचे ३१ नगरसेवक व शिवसेनेची मदत घेऊनही मधू चव्हाण यांना कमी मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता.
२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले असून मनसेचे सहा व पक्ष आणि जात पडतळणीत निवडून आलेल्या नगरसेवकांसह शिवसेनेची एकूण सदस्य संख्या ही ९७ पर्यंत पोहोचली आहे. तर भाजपचे ८४ नगरसेवक असून डॉ. राम बारोट आणि सुनील यादव यांच्या निधनामुळे दोन जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे ८१ नगरसेवक आहेत.

जगतापांना बोजा बिस्तर गुंडाळावा लागणार

मुंबईत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी संबंधित उमेदवाराला ७९ मतांची गरज असते. त्यामुळे महापालिकेतील शिवसेना, भाजप आणि काँग्रेसचे संख्याबळ पाहता शिवसेनेचा आणि भाजपचे उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातुलनेत विद्यमान आमदार असलेल्या भाई जगताप यांच्या पक्षाची सदस्य संख्या २९ आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ०८ व समाजवादी पक्ष यांचे ०६ व शिवसेनेच्या उर्वरित नगरसेवक यांची मोट बांधून काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्यात ६० पर्यंत मते पडू शकतील. त्यामुळे काँग्रेसच्या जगताप यांना आपला बोजा बिस्तर गुंडाळावा लागणार आहे. मागील निवडणुकीत नारायण राणे हे काँग्रेस पक्षात असल्याने त्यांनी ही जबाबदारी उचलली होती, पण हे धाडस दाखवणारी व्यक्ती काँग्रेस पक्षात आणि भाई जगताप यांच्या जवळपास नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष ही रिस्क उचलण्याच्या मनस्थितीत नसणार आहे.

(हेही वाचा- …म्हणून साहित्य संमेलनस्थळी धडकणार ‘सावकरांच्या साहित्याची दिंडी’)

कदमांचे विधान परिषदेत जाण्याचे दरवाजे बंद

भाई जगताप हे मुंबई अध्यक्ष असले तरी त्यांना मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकेतून सेटिंग लावावी लागणार आहे. पण त्यांची तिथे वर्णी लागणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे अन्य मार्गाने विधान परिषदेत जावे लागणार आहे. पण या निवडणुकीपासून तरी भाई जगताप लांब राहून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी कडे लक्ष वेधावे लागणार आहे. तर शिवसेना नेते व आमदार रामदास कदम यांचे विधान परिषदेत जाण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ते गैरहजर राहिले होते. त्यामुळे या भाईंचा पत्ता कापून दुसऱ्या कोणाची वर्णी लावण्याच्या विचारात शिवसेना आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळ असणारे वरळीचे आमदार व माजी मंत्री सचिन अहिर व आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्याग करणारे या विभागाचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या पैकी कुणाच्या गळ्यात ही उमेदवारी पडते याकडे सर्वांचे लक्ष आहे. युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांचे नाव चर्चेत असले तरी सरदेसाई यांना पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेत पाठवण्याची इच्छा आदित्य ठाकरे यांची आहे. त्यामुळे जर अहिर किंवा शिंदे यांना उमेदवारी न दिल्यास युवा सेनेच्या अभ्यासू पदाधिकाऱ्याला विधान परिषदेत पाठवण्याचा विचार केला जाईल, असेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.