राम कुलकर्णी म्हणतात…’ठाकरे सरकार उलट्या काळजाचं’!

114

राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते जनतेसाठी माय-बाप असते. व्यवस्था अनेक असतात पण, व्यवस्थेत उद्‌भवलेले प्रश्न निकाली काढणे सरकारचे काम असते. मात्र सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार उलट्या काळजाचे असून या सरकारने एस.टी.कामगारांचा संप चालूच ठेवून कामगारांना व ऐन दिवाळीत प्रवासी जनतेला वेठीस धरले आहे. विविध विभागातील भरत्यांचा प्रश्न चव्हाट्यावर असताना सरकार आणि त्याचे सर्व मंत्री फक्त आर्यन प्रकरणात गुंतले आहेत. राज्याचा एक मंत्री संविधान पायदळी तुडवत महिलांच्या बाबतीत अनुद्‌गार काढत व्यक्तिद्वेषाने पेटतो त्या नवाब मलिकांवर कुठलीही कारवाई मुख्यमंत्री करत नाहीत. मात्र बिचारे एस.टी.कामगार चार दिवस संप करू लागले. त्यांचे प्रश्न सोडवणं बाजूलाच ठेवून निलंबनाचा धडाका लावला. अर्थातच संवेदनशीलता, सौजन्य आणि जनतेचं पालकत्व या साऱ्या गोष्टीचा सरकारला विसरच कसा पडला? असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

सरकारवर आरोप

वर्तमानकाळात जे प्रश्न पुढे आले, जी संकट आली ती हाताळण्यात सरकारला अपयश आले. दिवाळीपासून एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करा, वेतनवाढ द्या तथा इतर मागण्यांसाठी ही मंडळी रस्त्यावर उतरली. ऐन दिवाळीत हा संप सुरू झाला. ठाकरे सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाची दखलच घेतली नाही. या प्रश्नावरून कामगारांना आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे महापाप ठाकरे सरकारने केले आहे. असा, आरोप राम कुलकर्णी यांनी केला आहे. एवढ्या उलट्या काळजाचं निगरगट्ट सरकार जनतेने कधीच पाहिलं नाही. असेही ते म्हणाले.

( हेही वाचा : मलिक तर ‘प्रसारमंत्री’, कर्तव्यदक्ष मंत्र्याची नियुक्ती करा! )

भाजपा नेते पाठीशी

एसटीचे कामगार मुंबईच्या मैदानावर आंदोलन करत आहेत. पण त्यांना भेटण्याचं सौजन्य देखील सरकार दाखवत नाही. हा संप मिटावा म्हणून भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी खंबीरपणे कामगारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण सरकारला किंचितही पान्हा फुटायला तयार नाही. खरं तर एसटी कामगारांमध्ये महिला पण आहेत. श्रमाच्या आधारावरही त्यांना मोबदला मिळत नाही हे दुर्दैव आहे. राज्यात सामाजिक प्रदूषण आणि व्यक्तिद्वेषाचं राजकारण निर्माण केले जात आहे. हे सारे प्रकार संताप आणणारे आहेत. सरकारने डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. असा, खोचक सल्ला राम कुलकर्णी यांनी सरकारला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.