शिवसेनेत आदित्य पर्व जेव्हापासून सुरु झाले तेव्हापासून जुने जाणते शिवसैनिक पिछाडीवर गेले असून युवा सेना पुढे येऊ लागली आहे. येणाऱ्या मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकांमध्ये याचे दृश्य परिणाम पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधीच विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याची झलक पाहायला मिळत आहे.
परिषदेसाठी स्पर्धा!
मुंबईतून विधान परिषदेवर गेलेले रामदास कदम यांचा कालखंड संपणार आहे. पक्षांतर्गत राजकरण केल्यामुळे कदम यांना पुन्हा संधी मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या जागेवर आता स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये ज्यांनी आदित्य ठाकरेंसाठी आमदारकी सोडली ते सुनील शिंदे समोर आले आहेत, तर ज्यांनी आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली सचिन अहिर यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर दुसरीकडे ज्यांनी मुंबई महापालिकेत अनेक आरोप-प्रत्यारोप होऊनही सेनेची बाजू खंबीरपणे मांडली, त्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील आशावादी बनल्या आहेत. मात्र या सर्व नावामध्ये एक नाव विशेष लक्ष केंद्रित करू लागले आहे, ते म्हणजे वरुण सरदेसाई! युवासेनेचे सरचिटणीस!
(हेही वाचा : आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाने गृहनिर्माणाऐवजी उभ्या राहणार झोपड्या)
काय आहे सेनेची योजना!
येत्या १० डिसेंबरला परिषदेची निवडणूक होणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सरचिटणीस आहेत. शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. सध्या आदित्य ठाकरे निवडणुकीच्या राजकरणात विशेष लक्ष घालू लागले आहे, साहजिकच यामुळे युवा सेनेला विशेष प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागेवर वरुण सरदेसाई यांच्या नावाच्या चर्चेने सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. वरुण सरदेसाई यांना आमदारकी दिल्यास येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी अनेक जुन्या शिवसैनिकांना आपसूकच संदेश मिळेल आणि निवडणुकीचे पर्व शांततेत जाईल, अशी त्यामागील सेनेची योजना असावी, अशी चर्चा सुरु आहे.
Join Our WhatsApp Community