कालपासून राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारप्रकरणी ईडीने काही ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर प्रतिहल्ला करण्यासाठी भाजपचा एका माजी मंत्र्याने मंदिरांच्या जमिनीचा घोटाळा केला आहे, तो बाहेर काढणार आहोत, असे जाहीर करत ‘तुम्ही वक्फ घोटाळा काढता आम्ही मंदिर घोटाळा काढू’, अशी नवी खेळी जाहीर केली आहे.
गुरुवारी दुपारपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की, आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणात ईडीने छापेमारी केलेली आहे. नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होणार, नवाब मलिक गोत्यात येणार, याप्रकारे बातम्या पेरण्यात आल्या आहेत. मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो की, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खूश करण्यासाठी अशा बातम्या पेरू नका. पत्रकार परिषद घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे काही सत्य आहे ते जाहीर करा.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
पुण्यात ज्या प्रकरणात ईडीने कारवाई केली. पुणे एमआयडीसीने भूसंपादन करुन भूसंपादन अधिकाऱ्यांकडे पैसे दिले. खोटे कागदपत्रे तयार करुन लोकांनी सरकारी कार्यालयातून पैसे घेतले. त्या प्रकरणाची बोर्डाला माहिती होताच बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पाच जणांना अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ईडी जर आम्हाला क्लीन अपसाठी मदत करत असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मलिक म्हणाले.
(हेही वाचा : ओबीसी आरक्षणाविनाच होणार २०२२मधील निवडणुका?)
मंदिर जमीन घॊटाळ्याचा भांडाफोड
आम्ही सात प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. वक्फ बोर्डाने क्लीन अप मोहीम महाराष्ट्रात सुरू केली. भाजप म्हणते की, नवाब मलिकांचा वक्फ बोर्डाचा घोटाळा बाहेर काढणार. आम्ही तर म्हणतोय क्लीन अप ड्राईव्ह सुरू होऊद्या. भाजपच्या एका माजी मंत्र्याने शेकडो जमीन मंदिराची हडप केली आहे. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी अशा प्रकारची लुट केली आहे, त्या सर्वांवर कारवाई व्हाययला हवी. मंदिराची जमीन माजी मंत्र्याने कशी हडप केली आणि कशा प्रकारे शेकडो कोटी रुपये खाल्ले त्याचाही भांडाफोड लवकरच करणार आहे, असे मलिक म्हणाले.
Join Our WhatsApp Community