राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन अद्याप सुरुच आहे. आंदोलनच्या पाचव्या दिवशीही आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशा निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान, या आंदोलनामध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब देखील उतरले आहेत. राज्यात काही जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन, रस्त्यावर भीक मागो आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप सुरू असून राज्यातील २५० एसटी बस डेपो बस फेऱ्याविना ठप्प आहेत. संप गेल्या आठवड्यात सुरू झाला असला तरी या आंदोलनाची हाक एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर दिली होती. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील एसटी सेवा पूर्णतः कोलमडल्याचे दिसत आहे. अशा परिस्थिती एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांसाठी भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – ‘मनी लाँड्रिंग’प्रकरणी देशमुखांचा ‘ईडी’ कोठडीतील मुक्काम वाढला)
यापूर्वी एसटी महामंडळाकडून कोणतेही आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले नव्हते. मात्र सोशल माध्यमांद्वारे एसटी देत असलेल्या विविध सेवा सुविधांबद्द्लची माहिती तसंच विविध प्रमुख एसटी डेपोमनधून सुटणाऱ्या एसटीचे वेळापत्रक अशा माहिती देण्याचा सपाटा एसटी महामंडळाने लावला होता. अखेर आज एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करत संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
असे केले कर्मचाऱ्यांना आवाहन
एसटी महामंडळाने आज कामगारांना उद्देशून एक पत्रक जाहीर केले आहे. त्या पत्रकात भावनिक आवाहन करण्यात आल्याचे दिसत आहे. महामंडळाने कामगारांसाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आपली लालपरी आधीच आर्थिक संकटात आहे. संप करून तिला आणखी गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असे असूनही गेल्या १८ महिन्यांचे वेतन महामंडळाने दिले आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३५४९ कोटींचा निधी दिला आहे. यापुढे सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
नम्र आवाहन🙏
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/PFZO6do9Ge— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) November 12, 2021
‘संप तातडीने मागे घ्या’
याशिवाय मंडळाकडून पत्राद्वारे असेही सांगण्यात आले की, ‘शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता (२८ टक्के) व घरभाडे भत्त्याची (८,१६,२४ टक्के) आपली मागणी मान्य करण्यात आली आहे. दिवाळी भेटही देण्यात आली आहे. असे असताना विलिनीकरणाच्या अचानक पुढे आलेल्या मागणीसाठी संप सुरू आहे, त्या मागणीचाही विचार सुरू आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सध्याच्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. संपाचे विपरीत आर्थिक परिणाम आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेले कित्येक दिवस सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. या साऱ्याचा विचार करून आपण तातडीने संप मागे घ्यावा व कामावर रुजू व्हावे, अशी विनंती महामंडळाने कामगारांना केली आहे.
Join Our WhatsApp Community