मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लढाई सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी! भाजपाचा संकल्प

मुंबई भाजपाची कार्यकारिणी बैठक दादरमधील वसंत स्मृतीमध्ये संपन्न झाली.

98

गेल्या २५ वर्षांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून मुंबई शहराला आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे काम हे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने केलेले आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करण्यासाठी मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आणायची आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लढाई ही सत्तेसाठी किंवा आपला महापौर बसवण्यासाठी नसून मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही लढाई असल्याचा संकल्प मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी संकल्प करण्यात आला आहे.

मुंबईचे रस्ते जगात कुप्रसिद्ध

मुंबई भाजपची कार्यकारिणी बैठक दादरमधील वसंत स्मृतीमध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या राजकीय प्रस्तावामध्ये महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारावर टीका करण्यात आली. हा राजकीय प्रस्ताव मांडत पक्षाचे सरचिटणीस व आमदार यांनी गेल्या २४ वर्षांमध्ये २१,००० कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही मुंबई शहराचे रस्ते हे देशामध्येच नाही, तर संपूर्ण जगामध्ये खड्ड्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. आपण जेव्हा एखाद्या शहरांमध्ये उतरतो, तेव्हा त्या शहरामध्ये उतरल्यानंतर त्या शहरामध्ये प्रवास करीत असताना त्या शहरातले रस्ते कसे आहेत, त्यावरून आपण त्या शहराची प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण करीत असतो. मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मुंबई शहराचा नाव लौकिक हा अंतरराष्ट्रीय दर्जावर मोठा असतानाही मुंबई शहराला २५ वर्षांमध्ये साधे चांगले रस्तेही मिळाले नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तसेच दर पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणे याची सवय जणू काही मुंबईकरांना झालेलीच आहे, असे म्हटले आहे.

(हेही वाचा : मुंबई महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत साधला निशाणा)

मुंबईकरांचे ८ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे नाल्यात

गेल्या १० वर्षामध्ये विविध नाला रुंदीकरण व ४ पंपिंग स्टेशनच्या प्रकल्पावर ७ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही मुंबईची तुंबई ही दर पावसामध्ये झालेली दिसून येते. दरवर्षी नालेसफाईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका १०० कोटी पेक्षा जास्त पैसे खर्च करीत असते. परंतु मुंबईकरांचे ८ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे हे नाल्यामध्ये बुडून गेल्याचे चित्र हे मुंबई शहरासमोर दिसून येत आहे, असेही नमुद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.