मेट्रोपासून मुंबईकरांना वंचित ठेवण्याचे पाप भाजपने ‘या’ पक्षावर फोडले!

122

मेट्रोच्या कारशेडशिवाय मेट्रो होऊच शकत नाही. आरेच्या परिसरातील मेट्रो कारशेडचे काम फक्त अहंकारापोटी थांबविण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांनी पर्यावरणाच्या नावाखाली हे काम रोखत एकप्रकारे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे पाप केले. २,७०० झाडांचा बाऊ करणारी शिवसेना हे विसरली की गेल्या १० वर्षामध्ये त्यांचे राज्य असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने ३८,८९९ झाडे तोडण्याची परवानगी दिल्याची बाब निदर्शनास आणून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे पाप शिवसेना करत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केला.

कोविड काळात भ्रष्टाचार

मुंबई भाजपाच्या शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय प्रस्ताव मांडत भाजपाने शिवसेनेला टार्गेट केले आहे. रस्ते आणि नालाच नाही, परंतु कचरा, शाळा, इस्पितळ इ. अनेक विषयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई शहरात महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार कोविड काळामध्ये गाठला. ज्यावेळेला ३ हजार कोटीपेक्षा जास्त पैसे कोविड काळामध्ये विविध सामग्री, खरेदी व कोविड केअर सेंटर उभारण्याकरिता खर्च केले. ही सर्व कामे विना निविदा अर्थात निविदा न मागविता थेट कंत्राटदाराला दिली होती. यामध्ये ऑक्सिमीटर, थर्मामीटर, बॉडीबॅग, पी.पी.ई सूट, कोविड केअर सेंटर इ. अनेक विषयांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून ऑक्सिजन सिलिंडरमध्ये ही भ्रष्टाचार झालेला दिसून येतो, असेही म्हटले आहे. गोरेगावच्या नेस्कोमध्ये तर एका बिल्डरला कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम कोणतीही निविदा न मागवता दिल्याची बाबही समोर आलेली असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे मंडईमधून मच्छीमार कोळी बांधवांना बाहेर काढून मच्छीमार आणि कोळी जे मुंबईचे मूळ मुंबईकर नागरिक आहेत, त्यांनाही हाकलण्याचे काम हे शिवसेनेने केले असल्याचा आरोप मुंबई भाजपने केला आहे.

(हेही वाचा : मुंबई महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत साधला निशाणा)

गेल्या २ वर्षांत सर्व प्रकल्पांचा बट्ट्याबोळ करण्याचे काम  

सन २०१४ ते २०१९ कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना भाजपा सरकारने मुंबईचे प्रलंबित असलेले मेट्रो, वरळी ट्रांस हार्बर लिंक, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे अनेक प्रकल्प हे रेकॉर्ड वेळेमध्ये मार्गी लावले, तसेच २०११ पर्यंतच्या सर्व झोपडपट्टीवासियांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मोफत घरे देण्याचा कायदा ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित केला. मुंबई शहरामध्ये २५६ किलोमीटर मेट्रोचे काम सुरु करण्याचा ऐतिहासिक प्रकल्प हा फडणवीस सरकारने मार्गी लावला. परंतु या सर्व प्रकल्पांचा बट्ट्याबोळ करण्याचे काम हे गेल्या २ वर्षांत महाविकास आघाडी सरकारने केल्याची टीकाही भाजपने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.