आता एसटी कामगार कुटुंबकबिल्यासह उतरणार रस्त्यावर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे शुक्रवारी रात्रभर आझाद मैदानात एसटी कामगारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते.

155

राज्याती एसटी कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही सुरूच राहणार आहे. सरकारने निलंबनाची कारवाई सुरु केली तरी कर्मचाऱ्यांनी संपाची तलवार म्यान केली नाही. उलट शनिवारपासून कर्मचारी कुटुंबकबिला घेऊन आगारांसमोर निदर्शनाला बसणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

एसटीच्या आंदोलनाच्या संदर्भात परिवहनमंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक झाली नाही. जी बैठक झाली ती सर्वांसमक्ष एकत्र झाली होती. परिवहनमंत्री दिशाहीन वक्तव्य करून खोटे बोलत आहेत, असा आरोप शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. सदाभाऊ खोत म्हणाले की, एसटी कर्मचारी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी राज्य सरकार पोलिसांना समोर आणून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले. कोणताही चर्चेचा प्रस्ताव आंदोलनस्थळी आला नाही. तातडीने अनिल परब यांचा राजीनामा घ्यावा. नवीन परिवहनमंत्री येईल, त्याच्याबरोबर आम्ही चर्चेला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅश भरण्याच्या कंत्राटासाठी बाहेरच्या व्यक्तीला ९ कोटी दिले जातात, ते कशाला हवे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

कर्मचाऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे आणि संप मागे घ्यावा, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात येणार आहे. विरोधक या संपात आपली पोळी भाजून घेत आहेत, भाजपने कामगारांना भडकवले आहे, त्यांना माहीत आहे त्यांनी चुकीची मागणी लावून धरली आहे म्हणून ते आता भरकटवण्यासाठी काहीही आरोप करतील, काहीही विषय काढतील, विलीनीकरणाच्या मागणीसाठी त्यांनी समितीसमोर जावे. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर संप भडकवण्याचे काम करत आहेत. एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असे वागू नका. 
अनिल परब, परिवहन मंत्री

दरेकर रात्रभर आझाद मैदानात 

दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे शुक्रवारी रात्रभर आझाद मैदानात एसटी कामगारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी तिथेच कामगारांसोबत जेवण करून त्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

(हेही वाचा : ‘एसटी’चा संप मोडून काढण्यासाठी शिवसेनेचा ‘बेस्ट’ मार्ग)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.