वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बजाज फाऊंडेशनसोबत महापालिकेने केलेला करार रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर तसेच याबाबत सभागृहात ठराव केल्यानंतरही मुंबई महापौरांनी या संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली. ही जागा संस्थांकडून महापालिकेने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असतानाच महापौर यांनी स्वत: संग्रहालयाला भेट देत बजाज फाऊंडेशनलाला अप्रत्यक्ष पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यामुळे मनसेने याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
मनसेचा विरोध
भाऊदाजी लाड वस्तुसंग्रहालय अर्थात म्युझियमची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु करून यापूर्वी महापालिका सभागृहाने केलेले ठरावही रद्द करण्यात आले आहे. वस्तूसंग्रहालयाचा जागा जमनालाल बजाज आणि इंटक यांना भाडेकरारावर देण्यात आल्यानंतर या करारातील अटींचा भंग करत या जागेवर पार्टीचे आयोजन, शुटींग तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने मनसेचे तत्कालिन गटनेते संदीप देशपांडे आणि तत्कालिन मनसे नगरसेविका समिता नाईक यांनी याचा करार रद्द करण्याची मागणी केली होती. समिता नाईक यांनी यांचा करार रद्द करण्याची ठरावाची सूचना दोन वेळा मांडूनही ती विचारात घेतली गेली नव्हती. त्यानंतर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मांडलेली ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली होती.
(हेही वाचा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण युद्धपातळीवर सुरु)
महापौरांच्या भेटीवर आक्षेप
महापालिका, मेसर्स इंटक आणि जमनालाल बजाज फाऊंडेशन यांच्याबरोबरच १५ वर्षांकरता केलेला हा ठराव जानेवारी २०१८ ला संपुष्टात आला. तरीही या म्युझियमची वास्तू जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि इंटकच्या ताब्यातच आहे. ती अद्यापही महापालिकेने आपल्या ताब्यात घेतलेली नाही. महापालिका आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी ही जागा ताब्यात न घेता एकप्रकारे या संस्थांना मदत करत आहेत, त्यात आता महापौरांचीही भर पडली आहे. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून वस्तूसंग्रहालयाची जागा काढून घेण्याची प्रक्रिया राबवण्याची मागणी असताना तसेच प्रशासनातील काही अधिकारी यासाठी प्रयत्नशील असतानाच शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणीबागेतील या वस्तूसंग्रहालयाला भेट दिली. याप्रसंगी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व मानद संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या.
महापौरांचे संग्रहालयाच्या बाजूने मनोगत
याप्रसंगी बोलतांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे जगभरातील पुरातन वास्तू संग्रहालयापैकी एक आहे. जगभरातील पुरातन वास्तू जतन समितीने पुरस्कार देऊन याची नोंद घेतली आहे, याचा मला मुंबईची महापौर म्हणून अभिमान असल्याचे सांगितले. ज्या देवीमुळे मुंबईला मुंबई हे नाव पडले त्या मुंबादेवीचे शिल्प या संग्रहालयामध्ये असावे, अशी इच्छा सन २००८ साली शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार या संग्रहालयामध्ये सन २००९ मध्ये मुंबादेवीचे शिल्प बसविण्यात आल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई त्याची जडण-घडण, वास्तु आणि भाषा, पेहराव या सर्व बारीकसारीक बाबी या ठिकाणी पहायला मिळणार असून प्रत्येक मुंबईकर नागरिकांनी या संग्रहालयाला कुटुंबासह आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
महापौरांचा मनसेकडून निषेध
भाऊदाजी लाड वस्तूसंग्रहालयाची जागा ही मुंबई महापालिकेची आहे. वस्तूसंग्रहालयाची जागा इंटक आणि जमनालाल बजाज फाऊंडेशनला भाडेकरारावर चालवण्यात दिली आहे. परंतु ही संस्था याठिकाणी मालक म्हणून वावरत आहे. महापालिकेचे तत्कालिन आयुक्त आणि विद्यमान मुख्य सचिव सिताराम कुंटे हे या संस्थेवर असल्याने त्यांनी संग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी मैदानाच्या जागेवर बांधकाम करण्याचा आराखडा तयार केला होता. याला मनसेने तीव्र विरोध केला होता. या विरोधानंतर हा प्रस्ताव त्यांना गुंडाळावा लागला. परंतु या संस्थेच्या माध्यमातून कराराच्या अटींचा भंग केला जात आहे, म्हणून त्यांचे करार रद्द करण्याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. असे असतानाही महापौरांनी त्या वास्तूला सदिच्छा भेट देणे हे योग्य नसून याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे मनसेचे सरचिटणीस संजय नाईक म्हणाले.
Join Our WhatsApp Community